‘उज्ज्वला’नंतर आता ‘गृहआधार’, ‘दयानंद’ च्या वेतनात होणार वाढ

‘गोवा उज्ज्वला’ योजनेनंतर आता सरकार ‘दयानंद सामाजिक सुरक्षा’ व ‘गृह आधार’ योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनाच्या रकमेत गणेश चतुर्थीनंतर वाढ करणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ही वाढ ५०० रुपयांपर्यंत असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.


just now
‘उज्ज्वला’नंतर आता ‘गृहआधार’, ‘दयानंद’ च्या वेतनात होणार वाढ

गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : ‘गोवा उज्ज्वला’ योजनेनंतर आता सरकार ‘दयानंद सामाजिक सुरक्षा’ व ‘गृह आधार’ योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनाच्या रकमेत गणेश चतुर्थीनंतर वाढ करणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ही वाढ ५०० रुपयांपर्यंत असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने सरकार सध्या गतीने काम करत आहे. मंगळवारी नूतनीकरण केलेल्या डिचोली बसस्थानकाचे लोकार्पण झाले. बुधवारी पर्वरीतील उड्डाणपुलाचे लोकार्पण होत आहे. त्याचबरोबर वर्षाला तीन घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर मोफत देणाऱ्या ‘गोवा उज्ज्वला’ योजनेची कार्यवाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता ‘दयानंद सामाजिक सुरक्षा’ व ‘गृह आधार’ योजनांच्या मानधन रकमेतही वाढ करण्यात येणार आहे.

‘दयानंद सामाजिक सुरक्षा’ योजनेअंतर्गत सध्या लाभार्थ्यांना दर महिन्याला अडीच हजार रुपये, तर ‘गृह आधार’ योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात.
...
चौकट
तृतीयपंथी, पायलटांचाही योजनेत समावेश
‘दयानंद सामाजिक सुरक्षा’ योजनेत बदल करून त्यात तृतीयपंथी व पायलटांचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या १ लाख २९ हजार जणांना या योजनेचा लाभ मिळत आहे. पायलट आणि तृतीयपंथीयांचा समावेश झाल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे.
...
चौकट
‘उज्ज्वला’ लाभार्थी महिलांचे इतर लाभ सुरूच
‘गोवा उज्ज्वला’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे ‘गृह आधार’ आणि ‘दयानंद सामाजिक सुरक्षा’ योजनेचे लाभ नियमितपणे सुरू राहतील. लोकांनी विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. वर्षाला तीन सिलिंडर मोफत देणाऱ्या ‘गोवा उज्ज्वला’ योजनेबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ संदेश जारी करून सर्व गैरसमज दूर केले. उज्ज्वला योजनेचे अर्ज पंचायती, नगरपालिका आणि आमदारांच्या कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अतिरिक्त अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त झाले असून, त्याबाबत नागरी पुरवठा खात्यानेही स्पष्टीकरण दिले आहे.
...
पॉइंटर चौकट
योजनांविषयी संभ्रम दूर करताना मुख्यमंत्री म्हणाले...
‘अ’ श्रेणी गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आहे. या महिलांनी अर्ज भरून द्यावेत, जेणेकरून त्यांच्या बँक खात्यात उज्ज्वला योजनेची रक्कम जमा करता येईल. पहिल्या टप्प्यात अडीच लाख महिलांसाठी उज्ज्वला योजनेचे पैसे पाठविण्यात आले असून, त्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल.
‘ब’ श्रेणी गृह आधारचा लाभ न घेणाऱ्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसलेल्या, मात्र कुटुंबातील पुरुष सदस्याला संबंधित लाभ मिळत असल्यास, अशा कुटुंबांसाठी आहे. या कुटुंबांनी संबंधित अर्ज भरावेत. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार दिवसांत त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
‘गोवा उज्ज्वला’ योजनेचा लाभ घेतल्यास गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभ बंद होतील किंवा आतापर्यंत मिळालेले पैसे परत द्यावे लागतील, असा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. भाजप सरकारने योजनेअंतर्गत दिलेली रक्कम कधीही परत घेतलेली नाही. तसेच एखादी योजना सुरू केल्यानंतर दुसरी योजना बंद केलेली नाही. चतुर्थीपूर्वी लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी ही योजना सुरू केली आहे.
पंचायती आणि नगरपालिकांनी प्राप्त झालेले ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील अर्ज स्वतंत्र करून तालुक्यातील नागरी पुरवठा कार्यालयातील नोडल अधिकाऱ्याकडे जमा करावेत. दोन दिवसांत रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

हेही वाचा
सर्व पहा