म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवत विविध आकारांतील आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. या मूर्ती सर्वसामान्य नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध झाल्या असून कारागृहातील गणेश चित्रशाळेत त्या अत्यंत वाजवी दरात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. कैद्यांच्या एका गटाने या मूर्ती घडवल्या आहेत.
कैद्यांच्या पुनर्वसन आणि सुधारणा उपक्रमाचा भाग म्हणून गणेश चतुर्थी निमित्त गणेश मूर्ती बनवण्याच्या योजना गेल्या काही वर्षांपासून तुरूंग प्रशासनाकडून सुरू आहेत. शिवाय या उपक्रमांतर्गत सुगंधी मेणबती, जुन्या मासिकांच्या कागदांपासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, सुतारकाम विभागामध्ये आकर्षक लाकडी वस्तू, संगणक टेबल अशा उत्पादनांची निर्मिती केली जात आहे. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात कैदी आपल्या कौशल्याचा वापर करून आकाशकंदील, नागोबाच्या मूर्ती, नरकासुर मुखवटे आणि सुंदर गणेशमूर्ती तयार करतात.
कारागृह अधीक्षक सुचिता देसाई आणि कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे कैद्यांना अशा उपक्रमांमध्ये सतत प्रोत्साहन मिळत आहे. हल्लीच झालेल्या नागपंचमी सणावेळी कैद्यांनी बनवलेल्या नागोबाच्या मूर्तींना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता गणेश मूर्तींना देखील असा प्रचंड प्रतिसाद मिळेल, अशी आशा तुरूंग प्रशासनाला आहे.
कारागृहाच्या औद्योगिक विभागाचे प्रभारी विलास परब यांनी सांगितले की, मातीकाम विभागातील कैद्यांनी सुलभ अशा मूर्ती बनवल्या आहेत. यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. पूर्णपणे पर्यावरणपूरक असलेल्या या मूर्ती आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मांद्रे येथून आणलेली खास पारंपरिक चिकणमाती वापर करून या मूर्ती तयार केल्या आहेत. कैद्यांनी आपल्या कल्पकतेने एक फूट, दीड फूट आणि तीन फूट अशा वेगवेगळ्या आकारांत या मूर्ती अत्यंत देखण्या पद्धतीने साकारल्या आहेत.
गणेशमूर्ती मिळणार घरपोच
विलास परब यांनी सांगितले की, या मूर्तींची मागणीनुसार घरपोच देण्याची व्यवस्था कारागृह प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. फोंडा येथील एका स्थानिक व्यावसायिकाने या मूर्तींची मोठी ऑर्डर देऊन कैद्यांच्या या उपक्रमाला मोलाचा हातभार लावला आहे. नागरिकांनी कैद्यांनी साकारलेल्या या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची पुढे येऊन खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.


