गोवन वार्ता प्रतिनिधी
डिचोली : डिचोलीतील ज्येष्ठ पत्रकार तथा डिचोली पत्रकार संघाचे अध्यक्ष विशांत वझे यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात बोर्डे डिचोली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
विशांत वझे यांना २२ ऑगस्ट रोजी ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली व रविवार, ६ सप्टेंबर रोजी दुपारी २.४० वा. त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट यांच्यासह मान्यवरांनी शोक व्यक्त केला होता.
सोमवार, ७ रोजी दु. १२.३० वा. विशांत वझे यांचे पार्थिव त्यांच्या राधानगर बोर्डे येथील निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट, पद्मिनी फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत, माजी सभापती राजेश पाटणेकर, माजी आमदार नरेश सावळ, माजी नगराध्यक्ष कुंदन फळारी, विजयकुमार नाटेकर, विविध वृत्तपत्रांचे संपादक, प्रतिनिधी, नगरसेवक, डिचोलीतील सामाजिक, सांस्कृतिक, संस्थांचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. बोर्डे डिचोली येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र गिरीश वझे यांनी मंत्राग्नी दिला. उपस्थित लोकांनी यावेळी त्यांच्याविषयीच्या स्मृती ताज्या केल्या.


