पेडणे : पेडणे येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील काही हंगामी स्वरूपातील शिक्षकांची इतरत्र बदली करण्यात आल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी वर्गावर बहिष्कार घालत विद्यालयाच्या परिसरात जोरदार निदर्शने केली. शिक्षकांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा विद्यालयातच नियुक्त करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
शिक्षकांच्या बदलीमुळे अध्यापनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. वर्गावर बहिष्कार टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या परिसरात एकत्र येत घोषणाबाजी केली. ‘आम्हाला न्याय हवा, आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दुमदुमून सोडला.
बदली झालेल्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य राहण्यास मदत होत होती. त्यामुळे त्यांची बदली रद्द करून पूर्वीप्रमाणे अध्यापनाची व्यवस्था कायम ठेवावी, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे.
विद्यालय प्रशासनाची भूमिका काय?
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू नये यासाठी काही शिक्षकांनी माध्यम प्रतिनिधींनी आंदोलनाचे वार्तांकन करू नये, अशी सूचना केल्याचेही समोर आले. त्यामुळे या प्रकाराबाबत विद्यालय प्रशासनाची भूमिका काय, याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


