मोपा विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली तीन जिवंत काडतुसे

दिल्लीला जाण्यापूर्वी सुरक्षा तपासणीत उघड; मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mopa) सुरक्षा तपासणीदरम्यान एका प्रवाशाच्या सामानात तीन जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली. संबंधित प्रवाशाकडे ही काडतुसे बाळगण्यासाठी आवश्यक वैध परवाना तसेच विमानातून ती वाहून नेण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
4 hours ago
मोपा विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली तीन जिवंत काडतुसे

पेडणे : मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mopa) सुरक्षा तपासणीदरम्यान एका प्रवाशाच्या सामानात तीन जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली. संबंधित प्रवाशाकडे ही काडतुसे बाळगण्यासाठी आवश्यक वैध परवाना तसेच विमानातून ती वाहून नेण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली.

ही घटना ७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४८ वाजता मोपा विमानतळावर घडली. सौरभ धर्मचंद कौशिक (वय ३३, रा. फरीदाबाद, हरियाणा) हा प्रवासी मोपा विमानतळावरून अकासा एअरच्या क्यूपी१८१४ (QP1814) या विमानाने दिल्लीला जाणार होता.मात्र सुरक्षा तपासणीदरम्यान त्याच्या बॅगेत तीन जिवंत काडतुसे आढळून आली. याबाबत विमानतळावरील ‘इनलाइन स्क्रीनिंग सिक्युरिटी अँड व्हिजिलन्स’ विभागाचे ‘ड्युटी मॅनेजर’ लोहित पी.एन. यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

प्रवाशाला काडतुसे बाळगण्यासाठी आवश्यक वैध शस्त्र परवाना सादर करता आला नाही. तसेच विमानातून काडतुसे नेण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची आवश्यक परवानगीही त्याच्याकडे नव्हती. त्यामुळे ‘ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी’च्या (BCAS)  मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ( BNSS) कलम ३५(३) अन्वये प्रवाशाला नोटीस बजावून चौकशी सुरू केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोपा विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्नील किनळेकर करीत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा