मडगावात उज्ज्वला योजनेचा शुभारंभ; पालिकेबाहेर नागरिकांची मोठी गर्दी

मडगाव पालिकेत मोफत ३ गॅस सिलिंडर योजनेचे फॉर्म घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती! मंत्री दिगंबर कामत यांनी ५ काउंटर्सवरून अधिकृत फॉर्म वितरणाला सुरुवात केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
05th September, 04:28 pm
मडगावात उज्ज्वला योजनेचा शुभारंभ; पालिकेबाहेर नागरिकांची मोठी गर्दी

मडगाव: सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते मडगाव नगरपालिका सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात उज्ज्वला योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडरचा लाभ दिला जाणार असून, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतून ही योजना तयार करण्यात आल्याचे मंत्री कामत यांनी सांगितले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मडगाव पालिकेबाहेर सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या.

नागरिकांची वाढती गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी मडगाव पालिकेचे मुख्य प्रवेशद्वार तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले होते. परिस्थिती नियंत्रणात आणताना मंत्री कामत यांनी सर्व नागरिकांना पुरेसे फॉर्म उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन देत शांततेचे आवाहन केले. पालिका क्षेत्रात फॉर्म वितरणासाठी पाच स्वतंत्र काउंटर्स उभारण्यात आले असून पंचायत क्षेत्रातील नागरिकांना पालिकेतून अर्ज दिले जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याशिवाय, नागरी पुरवठा खात्याचा (Civil Supplies) अधिकृत शिक्का असलेलेच मूळ फॉर्म स्वीकारले जातील; कोणत्याही झेरॉक्स प्रती किंवा मध्यस्थांमार्फत आणलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असा इशाराही कामत यांनी दिला आहे.

दरम्यान, या योजनेवरून राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांनी या योजनेला आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणलेली 'जुमला योजना' असे संबोधले आहे.  नागरिकांनी गर्दी केली असली, तरी प्रत्यक्षात 'गृह आधार' किंवा 'दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा' (DSS) लाभ घेणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अर्जातील नियमांनुसार एकाच योजनेचा लाभ घेणे शक्य असल्याने, नवीन फॉर्म भरल्यास पूर्वीची कल्याणकारी योजना बंद होण्याचा अथवा वितरित रक्कमेची वसुली होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या योजनेच्या पात्रता निकषांबाबत नागरिकांमध्ये स्पष्टता आणावी आणि नागरिकांनी अर्ज भरताना पूर्ण काळजी घ्यावी, अशी मागणी सावियो कुतिन्हो यांनी केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा