चर्चेची वार्ता : संस्कृती जपून ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण हवे!

डीजेवर अंशत: बंदी हवी : मध्यरात्री १२ नंतर अशा कार्यक्रमांना परवानगी नसावी

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
03rd September, 11:53 pm
चर्चेची वार्ता : संस्कृती जपून ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण हवे!

पणजी :‘गोवन वार्ता’ने आपल्या ‘चर्चेची वार्ता’ या विशेष उपक्रमांतर्गत गोव्यात नरकासुराच्या दिवशी डीजेंवर बंदी यावी का? यावर वाचकांची मते मागवली. वाचकांनी यावर विविध मते वर्तवली आहेत. नरकासूर हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे डीजेला परवानगी द्यावी; मात्र आवाजाची पातळी कमी ठेवण्याची अट असावी, असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. 

नरकासूर ही गोव्याची सांस्कृतिक परंपरा आहे; हा केवळ डीजेचा विषय नाही, तर आपल्या परंपरेचा आणि उत्साहाचा विषय आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे संस्कृतीही जपली पाहिजे आणि ध्वनिप्रदूषणावर नियंत्रणही ठेवले पाहिजे. - राजेंद्र पेडणेकर

सकाळी उठून, अभ्यंग स्नान करून ‘गोविंद गोविंद’ म्हणत कारीट फोडणे ही आपली खरी परंपरा. नरकासूर प्रतिमेची मिरवणूक वगैरे प्रकारात कुमारवयीन मुले नव्याने दारुचे सेवन करायला शिकतात, जे अनेकांचे जीवन पुढे बरबाद करते.- रुपेश पाटकर

मध्यरात्री १२ वाजल्यानंतर सुरू राहणारे कोणतेही संगीत कार्यक्रम, फटाक्यांची आतषबाजी किंवा इतर ध्वनिप्रदूषण करणारे कार्यक्रम बंदी घालण्यात यावेत. मग तो नरकासूर उत्सव असो, नववर्ष स्वागत सोहळा असो, लग्नसमारंभातील पार्टी असो किंवा कोणत्याही धर्म अथवा जातीशी संबंधित कार्यक्रम असो. मध्यरात्री १२ नंतर अशा कार्यक्रमांना परवानगी देऊ नये.- प्रमोद सावंत

हो, पण हे तरुण पिढीच्या नियंत्रणाखाली असले पाहिजे, कारण गोव्यातील तरुण पिढी सुशिक्षित आहे आणि ध्वनी प्रदूषणाबाबत त्यांना योग्य माहिती व जाणीव आहे. - राजेश कामत

दरवर्षी लोक पैसे कमावण्यात आणि कामाच्या धावपळीत व्यस्त असतात. त्यामुळे निदान एका दिवसाचा तरी मनमुराद आनंद त्यांना घेऊ द्या. मात्र, आनंद साजरा करताना इतरांना त्याचा त्रास होणार नाही, याचीही त्यांनी काळजी घ्यावी. कारण या धावपळीच्या जीवनात आनंद घेण्यासाठी आणि स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. - सादिक कटवेली

गोव्यातील लोकांसाठी नरकासूर हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे डीजेला परवानगी द्यावी; मात्र आवाजाची पातळी कमी ठेवण्याची अट असावी. - विकास कुंडईकर

केवळ नरकासूर का, गणपती विसर्जन, शिमगा मेळ, कार्निव्हल, शिवजयंती वगैरे उत्सवामधून डीजेला हद्दपार करा. - श्रीवल्लभ करमली

एक दिवसासाठी डीजे वापरला तर काय होते? - गणेश गावडे

बंदी घालणे हे चुकीचे आहे. डीजे लावून आनंद साजरा करणे आणि जागरण करणे यात काही गैर नाही. मात्र, त्यासाठी वेळेची मर्यादा आणि ध्वनीची मर्यादा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. इतरांना त्रास होईल इतका मोठा आवाज करणे चुकीचे आहे. त्यामुळे लोकांची झोपमोड होते आणि काही जणांना त्याचा त्रास होतो. तसेच, नरकासूर हा काही देव नाही.- प्रितेश सातोडकर

नाही... फक्त आमची चतुर्थी, नरकासुर, दिवाळी आणि आमचेच इतर कार्यक्रम दिसतात का? मग इतरांचे कार्यक्रम दिसत नाहीत का? हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. - शैलेश देसाई

नरकासूर वर्षातून एक दिवस, एक रात्र असतो. परंतु, मशिदींवर वर्षाचे ३६५ दिवस लाऊडस्पिकर चालू असतो. त्याच्यावर बंदी कधी येणार?- प्रसाद नाईक

पुण्यात गणपती ११ -२१ दिवस असतात. पण नरकासूर आमचो १ रात्र असतो. त्यामुळे बंदी कशाला होई? नरकासुराच्या रात्री कोण झोपत पण नाय. - ऋषिकेश मांजरेकर


हेही वाचा
सर्व पहा