पोटात प्लास्टिक गेल्याने महिन्याला ५० गुरांचा मृत्यू

राज्यात ओला आणि सुका कचरा प्लास्टिक पिशवीत गुंडाळून रस्त्याकडेला फेकला जातो. रस्त्यावरील गुरे अशा पिशवीतील अन्नासोबत प्लास्टिकही खातात. मात्र कालांतराने असे प्लास्टिक त्यांच्या पोटात जाऊन त्यांना वैद्यकीय समस्या उद्भवतात. काही प्रकरणांत अशा गुरांचा मृत्यूदेखील होतो. मागील चार वर्षांत राज्यात पोटात कचरा आणि प्लास्टिक गेल्याने २,३८० गुरांचा मृत्यू झाला आहे.


07th September, 11:05 pm
पोटात प्लास्टिक गेल्याने महिन्याला ५० गुरांचा मृत्यू

प्रतिनिधी गोवन वार्ता
पणजी : राज्यात ओला आणि सुका कचरा प्लास्टिक पिशवीत गुंडाळून रस्त्याकडेला फेकला जातो. रस्त्यावरील गुरे अशा पिशवीतील अन्नासोबत प्लास्टिकही खातात. मात्र कालांतराने असे प्लास्टिक त्यांच्या पोटात जाऊन त्यांना वैद्यकीय समस्या उद्भवतात. काही प्रकरणांत अशा गुरांचा मृत्यूदेखील होतो. मागील चार वर्षांत राज्यात पोटात कचरा आणि प्लास्टिक गेल्याने २,३८० गुरांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ प्लास्टिकमुळे महिन्याला सरासरी ५०, तर दिवसाला एकाहून अधिक गुरांना प्राण गमावावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पोटात प्लास्टिक अथवा कचरा गेल्याने २८९ गुरांचा मृत्यू झाला होता. २०२३-२४ मध्ये ४४३, २०२४-२५ मध्ये १०००, २०२५-२६ मध्ये ६४८ गुरांचा पोटात प्लास्टिक गेल्याने मृत्यू झाला होता. ही आकडेवारी केवळ गोशाळांमधील आहे. गोशाळेत आणण्यापूर्वी रस्त्यावरील अशा भटक्या गुरांच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक गेलेले असते. त्यामुळे प्रयत्न करूनदेखील त्यांना वाचवता येत नाही. वरील कालावधीत अन्य वैद्यकीय कारणांमुळे विविध गोशाळांतील १४१ गुरांचा मृत्यू झाला होता.
गोशाळांना ८४ कोटी रुपयांहून अधिक अनुदान मंजूर
राज्यात चार वर्षांत अपघातात जखमी झालेल्या २,०५० गुरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गुरांच्या पोटात गेलेल्या प्लास्टिकचे पचन होत नाही. यामुळे ते साचून राहते. यामुळे अंतर्गत अवयवांना इजा होऊन गुरांचा मृत्यू होतो. याशिवाय पोटात धातूचे तुकडे गेल्यानेदेखील गुरांचा मृत्यू होतो. सध्या सरकारतर्फे राज्यातील दहा गोशाळांना अनुदान देण्यात येत आहे. गोशाळांना ८४ कोटी रुपयांहून अधिक अनुदान मंजूर केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अथवा गोशाळेने वापर प्रमाणपत्र न दिल्यास अनुदान निधी तात्पुरता थांबण्यात येतो. सध्या या दहा गोशाळेत ८,१२८ गुरे आहेत.            

हेही वाचा
सर्व पहा