बागा येथे मद्यप्राशनानंतर घसरून पडल्याने पर्यटकाचा मृत्यू

शवचिकीत्सेनंतर होणार मृत्युचे नेमके कारण स्पष्ट; पोलिसांची माहिती

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
बागा येथे  मद्यप्राशनानंतर घसरून पडल्याने पर्यटकाचा मृत्यू

पणजी : बागा येथील एका अतिथीगृहात झाकीर खान (५४ वर्षे, रा. इमाम मोहल्ला, हल्लाडकेरी, हरिहर, दावणगेरे,कर्नाटक) या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मद्यप्राशन केल्यानंतर उलटी केली व त्यावर घसरून पडल्यानंतर झाेपेत त्याचे निधन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. शवचिकीत्सेनंतर नेमके कारण स्पष्ट होणार अ‍ाहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झाकीर खान यांच्यासह चार मित्रांनी बागा येथील कॉम्प्लेक्समधील लिलास कॉटेजच्या १०७ क्रमांकाच्या खोलीत मुक्काम केला होता. त्यानंतर झाकीर खान यांनी सकाळी साडेबारा वाजल्यापासून मद्यप्राशन केले होते. मद्यप्राशन केल्यानंतर त्यांनी खोलीत उलटी केली. उलटीवर पाय घसरून  खाली पडला. या घटनेत त्यांच्या नाकाला रक्तस्राव झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः खोली, नाकावरील रक्त आणि परिसर स्वच्छ केला व झोपण्यासाठी गेला.

काही वेळाने त्यांच्या मित्रांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता  प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर तातडीने १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. झाकीर खान यांना कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (GMC) शवागारात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विश्वजित ढवळीकर तपास करत आहेत. मृत्युचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हेही वाचा
सर्व पहा