पणजी : पश्चिम घाटातील जैवविविधतेचे वैशिष्ट्यपूर्ण प्रतीक असलेल्या मलय विहारणारा बेडूक (Rhacophorus malabaricus) या आकर्षक उभयचराच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणाऱ्या माहितीपूर्ण पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. मलय विहारणारा बेडूक मालाबार ‘ग्लायडिंग फ्रॉग’च्या जीवनचक्रावर आधारित पोस्टर आकर्षण ठरत असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली. गोव्यात मलय विहारणारा बेडूक संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला विश्व प्रकृती निधी- भारत२०२६ सालच्या संवर्धन प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत सहकार्य मिळाले असल्याचे आयोजकांतर्फे स्पष्ट करण्यात आले.

ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर आणि प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार रमण कुलकर्णी यांच्या हस्ते या पोस्टरचे लोकार्पण करण्यात आले.
गोव्याच्या पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या केरी, सत्तरी येथे कार्यरत विवेकानंद पर्यावरण जागृती फौज गेल्या २५ वर्षांपासून पर्यावरण जनजागृती, पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि जैवविविधता संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. पावसाळ्यातील रात्रीच्या निसर्ग भ्रमंतीदरम्यान संस्थेच्या स्वयंसेवकांना मलय विहारणाऱ्या बेडकाचे सातत्याने दर्शन होत होते. या निरीक्षणातून या वैशिष्ट्यपूर्ण बेडकाचा अधिक अभ्यास करण्याबरोबरच त्याच्या अधिवासाच्या संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली.

प्रकल्पाला विश्व प्रकृती निधी-भारत२०२६ सालच्या संवर्धन प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत सहकार्य
याच प्रयत्नातून गोव्यातील मलय विहारणारा बेडूक संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला विश्व प्रकृती निधी- भारत२०२६ सालच्या संवर्धन प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत सहकार्य मिळाले आहे. क्षेत्रीय संवर्धन, स्थानिक समुदायाचा सहभाग आणि पर्यावरण शिक्षण यांचा समन्वय साधत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
बेडकाच्या जीवनचक्रावर आधारित पोस्टरचे विशेष आकर्षण
या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेले मलय विहारणाऱ्या बेडकाच्या जीवनचक्रावर आधारित पोस्टर हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले आहे. पोस्टरमध्ये या बेडकाचे अंड्यांपासून पिल्लू आणि त्यानंतर प्रौढ बेडकापर्यंतचे संपूर्ण जीवनचक्र छायाचित्रांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आले आहे. प्रत्येक जीवनावस्थेची ओळख करून देतानाच त्याच्या नैसर्गिक अधिवासाची आणि जीवनपद्धतीची माहितीही देण्यात आली आहे.
पोस्टरमध्ये मलय विहारणाऱ्या बेडूकचे वर्तन, अधिवास, प्रजनन पद्धती, त्याच्यासमोरील धोके आणि संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना यांची माहितीही मांडण्यात आली आहे. त्यामुळे हे पोस्टर केवळ माहिती देणारे माध्यम न राहता विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, निसर्गप्रेमींसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी दृश्य स्वरूपातील शैक्षणिक साधन ठरणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.
“निसर्गाचे संवर्धन करायचे असेल, तर भावी पिढीला निसर्गाची ओळख करून देणे आणि त्याचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे,” या विचारातून हे पोस्टर तयार करण्यात आले आहेत. मलय विहारणाऱ्या बेडकाच्या जीवनचक्राची छायाचित्रांसह माहिती देऊन या प्रजातीबद्दल कुतूहल, संवेदनशीलता आणि संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे पोस्टर पुढील काळात गोव्यातील विविध शाळा, शैक्षणिक संस्था आणि जनजागृती कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणार आहेत. मलय विहारणारा बेडूक आणि त्याचा नैसर्गिक अधिवास जतन करण्याचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्यासाठी ते दीर्घकालीन दृश्य संवर्धन साधन म्हणून कार्य करणार आहे.
या प्रसंगी विवेकानंद पर्यावरण जागृती फौजचे प्रकल्प समन्वयक डॉ. संदेश गावस, संकेत नाईक, रमेश झर्मेकर, गजानन शेट्ये, पौर्णिमा केरकर, चंद्रकांत अवखळे, समृध्दी केरकर आणि विठोबा गावडे उपस्थित होते.


