ओढा प्रदूषित; कष्टी येथे गणेशमूर्तींचे बॅरलमध्ये विसर्जन

डुक्करपालन केंद्रातून सोडले जाते सांडपाणी; कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी : स्थानिक ओढ्याचे पाणी डुक्करपालन केंद्रातून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दूषित झाल्याने सावर्डे विधानसभा मतदारसंघातील कष्टी गावातील ग्रामस्थांनी यंदा दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन न करता पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये विसर्जन करण्याचा निर्णय घेतला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
ओढा प्रदूषित; कष्टी येथे गणेशमूर्तींचे बॅरलमध्ये विसर्जन

सावर्डे : स्थानिक ओढ्याचे पाणी डुक्करपालन केंद्रातून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दूषित झाल्याने सावर्डे विधानसभा मतदारसंघातील कष्टी गावातील ग्रामस्थांनी यंदा दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन न करता पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये विसर्जन करण्याचा निर्णय घेतला.

कष्टी गावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी अनेक वर्षांपासून स्थानिक नैसर्गिक ओढ्याचा वापर केला जात होता. मात्र, यंदा या ओढ्यात डुक्करपालन केंद्रातून येणाऱ्या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. त्यामुळे या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जित करणे योग्य नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामस्थांनी गेल्या काही दिवसांमागे आवाज उठवत ओढ्यात जाणारे  सांडपाणी रोखण्याची मागणी केली होती. गणेशमूर्तींचे कृत्रिमरित्या विसर्जन करण्याचा इशारा दिला होता.

धार्मिक विधी पार पाडताना दूषित पाण्याचा वापर होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी कृत्रिम विसर्जनाचा पर्याय स्वीकारला. पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करून ग्रामस्थांनी डुक्करपालन केंद्रातून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याकडे दुलर्क्ष करणाऱ्या शासकीय यंत्रणांचा निषेध केला.

गावाच्या इतिहासात प्रथमच  अशाप्रकारे विसर्जन 

गावाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे गणेशमूर्तींचे कृत्रिम विसर्जन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान, गावातून वाहणारा ओढा दूषित बनल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या ओढ्याचे पाणी शेती, गुरे आणि तत्सम कामांसाठी वापरले जात होते. मात्र, ओढा दूषित झाल्याने त्याचा परिणान सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक पंचायत तसेच संबंधित यंत्रणांनी डुक्करपालन केंद्रातून ओढ्यात सोडले जाणारे पाणी रोखावे व आवश्यक कारवाई करून समस्या सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा