२०२७मध्ये भाजपची उमेदवारी स्वीकारायची की नाही याचा विचार करावा लागेल : आमदार काब्राल

अनेक मतदारसंघांमध्ये सध्या ‘भाजप विरुद्ध भाजप’ अशी परिस्थिती; ‘‘भाजपने २०२७च्या विधानसभा निवडणुकीसाठी मला उमेदवारी दिली, तरी ती स्वीकारायची की नाही, याचा मला विचार करावा लागेल. जनताच माझे भविष्य ठरवेल. गेल्या १० वर्षांत भाजपमध्ये खूप बदल झाले आहेत,’’ अशी प्रतिक्र‌िया आमदार तथा माजीमंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
२०२७मध्ये भाजपची उमेदवारी स्वीकारायची की नाही याचा विचार करावा लागेल : आमदार काब्राल

पणजी : ‘‘भाजपने २०२७च्या विधानसभा निवडणुकीसाठी मला उमेदवारी दिली, तरी ती स्वीकारायची की नाही, याचा मला विचार करावा लागेल. जनताच माझे भविष्य ठरवेल. गेल्या १० वर्षांत भाजपमध्ये खूप बदल झाले आहेत,’’ अशी प्रतिक्र‌िया आमदार तथा माजीमंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केली आहे.

‘प्रुडंट’च्या ‘हेड ऑन’ कार्यक्रमात बोलताना आमदार काब्राल यांनी भाजपमधील अंतर्गत राजकारणावर भाष्य केले. अनेक मतदारसंघांमध्ये सध्या ‘भाजप विरुद्ध भाजप’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा प्रकार पक्षाच्या हिताचा नसल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या दहा वर्षांत भाजपमध्ये मोठे बदल झाले आहेत. इतर पक्षांतील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले; मात्र पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आणि विद्यमान आमदारांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप काब्राल यांनी केला.

आपण आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी स्वतःचे मंत्रिपद सोडले होते. मात्र, त्यानंतर आपल्या मंत्रिपदाबाबत पुन्हा विचार करण्यात आला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

निष्ठावंत आमदारांना मंत्रिमंडळापासून दूर का ठेवले जात आहे, तसेच सरकारी महामंडळांमध्येही त्यांना पदे का दिली जात नाहीत, असा सवाल आमदार काब्राल यांनी उपस्थित केला.

दरम्यान, पर्वरी उड्डाणपुलाच्या मुद्द्यावरून आमदार काब्राल यांनी आपल्या टीकाकारांवरही निशाणा साधला. यापूर्वी प्रकल्पाला विरोध करणारेच आता त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. काब्राल यांच्या या वक्तव्यामुळे गोवा भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा
सर्व पहा