मडगाव : येथील आके परिसरातून एका अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही घटना १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास घडली. तक्रारदार पित्याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या कायदेशीर संरक्षणाखाली असलेल्या अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले.
मुलाच्या पित्याच्या तक्रारीवरून मडगाव पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम १३७ (२) तसेच गोवा बाल कायद्याच्या (Goa Children's Act) कलम ८ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील सखोल तपास मडगाव पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक अनुष्का परब करत आहेत.


