मडगाव: येथील आके परिसरात मिनी बसने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ५२ वर्षीय दुचाकीचालकाचा बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश गावंडे (रा. दवर्ली) असे या अपघातातील मयताचे नाव आहे. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित मिनी बसचालक हमीद महमूद मामलेकर (रा. आर्ले, फातोर्डा) याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५.५५ वाजण्याच्या सुमारास घडली. हमीद मामलेकर हा आपल्या ताब्यातील मिनी बस घेऊन आके येथून पॉवरहाऊस जंक्शनच्या दिशेने जात होता. आके येथील टी. बी. कुन्हा शाळेजवळ पोहोचले असता, त्याच्या मिनी बसने पुढे चाललेल्या होंडा ॲक्टिव्हा स्कूटरला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात सुरेश गावंडे हे स्कूटरसह रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर संशयित बसचालकाने जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता किंवा घटनेची पोलिसांना माहिती न देता मिनी बससह घटनास्थळावरून पोबारा केला.
अपघाताच्या माहितीनंतर जखमी सुरेश गावंडे यांना तातडीने मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारांसाठी त्यांना बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित हमीद मामलेकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४(अ) आणि १३४(ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास मडगाव पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक अनुष्का परब करत आहेत.


