युनायटेड सर्व्हिसेस क्लब घोटाळा : गोवा, मुंबईसह एमपीतील १३.४४ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

'युनायटेड सर्व्हिसेस क्लब'मधील ७७ कोटींच्या रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी ईडीने गोव्यासह, मुंबई आणि एमपीमधील १३.४४ कोटींची मालमत्ता जप्त केली. संशयित बर्नार्डेट वर्माने पतीसोबत बोगस खाती उघडून हा निधी विविध ठिकाणी डायव्हर्ट केला होता.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
28 mins ago
युनायटेड सर्व्हिसेस क्लब घोटाळा : गोवा, मुंबईसह एमपीतील १३.४४ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

मुंबई : 'युनायटेड सर्व्हिसेस क्लब'मधील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कायदेशीर व प्रशासकीय कारवाई केली आहे. ईडीच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (PMLA) च्या तरतुदींनुसार संशयित बर्नार्डेट भरत वर्मा, तिचा पती भरतकुमार शंकरलाल वर्मा आणि इतर सहकाऱ्यांच्या १३.४४ कोटी रुपयांच्या स्थावर व जंगम मालमत्तांवर तात्पुरती जप्ती आणली आहे. यामध्ये मुंबई, गोवा आणि मध्य प्रदेशातील फ्लॅट्स, जमिनीचे भूखंड, बँकेतील फिक्स डिपॉझिट्स आणि शिल्लक रक्कमेचा समावेश आहे.

मुंबई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या विविध कलमांन्वये दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याच्या (FIR) आधारे ईडीने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. तपासादरम्यान निष्पन्न झाले की, बर्नार्डेट वर्मा ही युनायटेड सर्व्हिसेस क्लबमध्ये वित्त विभागात उपसचिव (Deputy Secretary - Finance) म्हणून कार्यरत असताना तिने पती भरतकुमार वर्मासोबत संगनमत केले. आरोपींनी क्लबच्या मूळ पुरवठादारांच्या (Vendors) नावाशी साधर्म्य असणारी अनेक बनावट व बोगस बँक खाती उघडली. या खात्यांचा वापर करून क्लबचा सुमारे ७७ कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने वळवण्यात आला. हा सर्व 'प्रोसीड्स ऑफ क्राईम' (गुन्हेगारीतून प्राप्त झालेला निधी) बर्नार्डेट, भरत वर्मा, त्यांचे नातेवाईक आणि सहकाऱ्यांच्या वैयक्तिक व संयुक्त बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आला.

आरोपींनी या अवैध निधीचा वापर मालमत्ता खरेदीसाठी आणि बँकेत मुदत ठेवींसाठी केला. तसेच, अपहारातील सुमारे ११ कोटी रुपये 'मॅसर्स ज्योतिर्गमय फाउंडेशन' या ट्रस्टच्या खात्यात ट्रान्सफर केले गेले. तेथून हा निधी क्लबचे चार्टर्ड अकाउंटंट (CA) चंद्र प्रकाश पांडे, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या नियंत्रणाखालील संस्थांच्या खात्यांमध्ये डायव्हर्ट करण्यात आला.

यापूर्वी २० मार्च २०२६ रोजी ईडीने या प्रकरणात ३४.५१ कोटी रुपयांच्या ३५ मालमत्ता जप्त केल्या होत्या. ताज्या कारवाईमुळे जप्त मालमत्तेचा आकडा आणखी वाढला असून, या संपूर्ण आर्थिक गुन्ह्याचा पुढील सखोल तपास ईडीकडून सुरू आहे.


हेही वाचा
सर्व पहा