बंदी झुगारून कोलव्यात पुन्हा धिरयो; पोलीस अनभिज्ञ

धिरयोच्या नावाखाली खुलेआम जुगार सुरू

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
1 hours ago
बंदी झुगारून कोलव्यात पुन्हा धिरयो; पोलीस अनभिज्ञ

मडगाव : उच्च न्यायालयाची बंदी आणि जिल्हा प्रशासनाचे कडक आदेश धाब्यावर बसवून सासष्टी तालुक्यात बेकायदा रेड्यांच्या झुंजी अर्थात धिरयो सुरूच असल्याचे रविवारी कोलवा येथे पुन्हा स्पष्ट झाले. दोन धिरयोंचे उघडपणे आयोजन करण्यात आले. या झुंजी पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.

रेड्यांच्या झुंजींवर लाखो रुपयांची पैज लावण्यात आल्याची माहिती असून, झुंजीच्या आडून जुगारही सुरू होता. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि जुगार सुरू असतानाही स्थानिक पोलिसांना याची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

यासंदर्भात कोलवा पोलिसांशी संपर्क साधला असता, आम्हाला या प्रकाराची कोणतीही माहिती नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जिल्हा प्रशासनाने बेकायदा रेड्यांच्या झुंजींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच अशा झुंजींमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असतानाही कोलवा परिसरात खुलेआम धिरयो भरविण्यात आल्याने प्रशासनाच्या आदेशांची अंमलबजावणी कितपत होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रेड्यांच्या झुंजीदरम्यान बिथरलेल्या रेड्यांनी गर्दीवर हल्ला केल्याच्या आणि त्यात राजेश निस्तानी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना यापूर्वी माजोर्डा येथे घडली आहे. त्यामुळे अशा झुंजींना परवानगी नसतानाही मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमवून त्यांचे आयोजन करणे धोकादायक ठरू शकते.

पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी

कोलवा परिसरात पोलिसांच्या उपस्थितीची किंवा कारवाईची कोणतीही ठोस चिन्हे न दिसल्याने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि बेकायदा धिरयो तसेच त्यामागील जुगारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.