म्हापसा : मोबाईलवरील विविध सूचनांची माहिती देण्याच्या बहाण्याने पोंबुर्फातील एका व्यक्तीला अज्ञात सायबर भामट्याने ३.८ लाखांना गंडा घातला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी लॉरेन्स परेरा यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. हा फसवणुकीचा प्रकार २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत घडला आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादींशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यांना त्यांच्या मोबाईलवर आलेल्या माहितीची सूचना देण्याचा बहाणा केला. नंतर संशयित आरोपीने त्यांच्या बँक खात्यातून एकूण ३ लाख ८ हजार ७१० रुपये रक्कम आपल्या बँक खात्यात हस्तांतरित करून घेतली. हा फसवणुकीचा प्रकार समोर येताच फिर्यादींनी सायबर गुन्हे विभागात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी शून्य कलमान्वये गुन्हा दाखल करून हा गुन्हा म्हापसा पोलिसांकडे वर्ग केला.
पोलिसांनी याप्रकरणी भा.न्या.सं.च्या ३१८ कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित नाईक हे करीत आहेत.


