म्हापसा : सहकारी महिला पत्रकार लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल हे सोमवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात शरण येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तेजपाल यांना तीन आठवड्यांच्या आत शरण येण्याचे निर्देश दिले होते.
गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने तेजपाल यांना १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १० लाख २१ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. तसेच न्यायालयाने आरोपीला शरण येण्याचा निर्देश दिला होता. या निवाड्याला आव्हान देत तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी तरुण तेजपाल यांच्या शरण न येण्याच्या अर्जावर सुनावणी घेत त्यांची ही विनंती अमान्य केली होती. तसेच आव्हान अर्जावरील सुनावणी घेण्यापूर्वी शरण येण्याचा आदेश दिला होता. तेजपाल यांना शरण येण्यासाठी तीन आठवड्यांची मुभा दिली होती व शिक्षेला आव्हान देणारी याचिकेवरील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी निश्चित केली होती.
या निर्देशानुसार तरूण तेजपाल यांनी शुक्रवार, ११ रोजी म्हापसा येथील उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर दि. १४ सप्टेंबर रोजी शरण येण्यासाठी अर्ज केला. न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी हा अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे तेजपाल हे सोमवारी सकाळी ११.३० वा. न्यायालयासमोर शरण येणार आहेत.
दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण गोव्यात ७ आणि ८ नोव्हेंबर २०१३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘थिंक फेस्ट’ या सोहळ्या दरम्यान घडले होते. या सोहळ्या दरम्यान एका आलिशान हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपाल यांनी आपल्याच एका सहकरी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी म्हापसा सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली होती.
त्यानंतर राज्य सरकारने या आदेशाला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणाच्या दीर्घ सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने तेजपाल यांना दोषी ठरवून १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १० लाख २१ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली होती. तसेच शरण येण्यास ४ आठवड्यांची मुदत दिली होती. या शिक्षेला तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. याशिवाय राज्य सरकारने त्यांना जन्मठेप देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.
शरणागतीपासून मुभेचा अर्ज फेटाळला
तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून शरण येण्यापासून मुभा मागितली होती. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत मुभा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तेजपाल हे सोमवारी न्यायालयासमोर शरण येणार आहेत.


