गोव्यातील मद्य वितरण कंपनीला घातला दोन कोटींचा गंडा

सीईओच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट; अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
10 hours ago
गोव्यातील मद्य वितरण कंपनीला घातला दोन कोटींचा गंडा

म्हापसा : गोव्यातून कारभार हाताळणाऱ्या एका प्रसिद्ध मद्य वितरण कंपनीला अज्ञात सायबर भामट्याने तब्बल २ कोटी रुपयांचा गंडा घातला. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा (सीईओ) फोटो व नाव व्हॉट्सअॅपच्या डीपीवर वापरून लेखापालाची दिशाभूल करण्यात आली. या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाने अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी ८ रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सायबर गुन्हे विभागात तक्रार दाखल केली. कंपनीच्या लेखापालाला एक ई-मेल प्राप्त झाला होता. तो उघडल्यानंतर त्यांचा लॅपटॉप हॅक झाल्याचे समोर आले. या लॅपटॉपवर लेखापालाचे व्हॉट्सअॅप खातेही कनेक्ट असल्याने संशयिताला त्याचा गैरफायदा घेता आला.
काही वेळाने लेखापालाला एका अनोळखी (७८९३७१२००४) क्रमांकावरून व्हॉट्सअॅप संदेश आला. या खात्याच्या प्रोफाइलवर कंपनीच्या सीईओचा फोटो होता. त्यामुळे समोरील व्यक्ती सीईओच असल्याचे समजून लेखापालाने त्याच्या सूचना खऱ्या मानल्या. संशयिताच्या सांगण्यावरून लेखापालाने आरटीजीएसद्वारे २ कोटी रुपये एका बँक खात्यात हस्तांतरित केले.
रक्कम हस्तांतरित केल्यानंतर लेखापाल आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, व्हॉट्सअॅपवरील संवाद बनावट होता. अज्ञात व्यक्तीने सीईओचे नाव व छायाचित्र वापरून त्यांचे सोंग घेतले आणि लेखापालाची फसवणूक करून कंपनीची रक्कम वळती केली.
सायबर गुन्हे विभागाकडून तपास
संगणक प्रणाली व तांत्रिक उपकरणांचा वापर करून दुसऱ्या व्यक्तीचे सोंग घेत फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने कोणत्या पद्धतीने लॅपटॉपमध्ये प्रवेश मिळवला, तसेच वळती केलेली रक्कम कोणत्या खात्यात आणि कुठे गेली, याचा तपास सायबर गुन्हे विभागाकडून सुरू आहे.      

हेही वाचा
सर्व पहा