मडगाव खून प्रकरणातील संशयिताला सशर्त जामीन

संशयित दोन वर्षांपासून कोठडीत : आईच्या देखभालीसाठी जाण्याचा संशयिताचा युक्तिवाद

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
मडगाव खून प्रकरणातील संशयिताला सशर्त जामीन

मडगाव : मडगाव येथील खून प्रकरणातील संशयित शानू सोनार याला दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. संशयित गेल्या दोन वर्षांपासून कोठडीत असून, खटल्याची संथ गती, साक्षीदारांची मर्यादित तपासणी आणि संशयिताची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याची बाब न्यायालयाने विचारात घेतली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. २६ ऑगस्ट २०२४ रोजी मडगाव जुन्या रेल्वेस्थानक परिसरात झालेल्या भांडणात काचेच्या बाटलीने हल्ला करून राजू अशोक कांबळे उर्फ असिफ मोहम्मद नदाफ (३५) याचा खून केल्याचा आरोप शानू सोनार याच्यावर आहे.
दरम्यान, न्यायालयाने पोलिसांनी जप्त केलेल्या चाकूवरील रक्ताच्या डागांचा डीएनए अहवाल नोव्हेंबर २०२४ पासून प्रलंबित आहे. अहवालाला झालेल्या विलंबाचे समाधानकारक कारण सरकारी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले नसल्याचे नमूद केले.
संशयिताच्या वकिलांनी शानू सोनार याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे सांगितले. तसेच त्याची आई आजारी असून तिची काळजी घेण्यासाठी त्याला घरी जाण्याची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद केला. या खटल्यासाठी २१ साक्षीदार नियोजित असताना आतापर्यंत केवळ एका साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली आहे. केवळ डीएनए अहवाल प्रलंबित असल्याच्या कारणावरून संशयिताला अनिश्चित काळासाठी कोठडीत ठेवता येणार नाही. प्रदीर्घ कोठडी ही शिक्षेचे स्वरूप धारण करू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
साक्षीदारांच्या जबाबामध्ये विसंगती
प्रकरणातील साक्षीदारांच्या जबाबांमध्ये महत्त्वाच्या बाबींवर विसंगती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दिव्याने संशयिताने काचेच्या बाटलीने वार केल्याचे सांगितले, तर अन्य साक्षीदाराने चाकूने वार केल्याचे नमूद केले. त्यामुळे हल्ल्यासाठी वापरलेल्या हत्याराबाबत जबाबांमध्ये फरक असल्याचे न्यायालयाने नोंदवले. या गुन्ह्यात वापरलेली फुटलेली सोड्याची बाटली फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेली नसल्याचेही स्पष्ट झाले.     

२५ हजारांचा वैयक्तिक बाँड

न्यायालयाने शानू सोनार याला २५ हजार रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि तेवढ्याच रकमेचे दोन हमीदार सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. तपासात सहकार्य करणे, पुराव्याशी छेडछाड न करणे आणि न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय राज्याबाहेर न जाण्याच्या अटी संशयिताला घालण्यात आल्या आहेत. तसेच साक्षीदारांवर दबाव न आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा