पणजी : गोवा सरकारने ‘गोवा राज्य बीच शॅक धोरण २०२३-२०२६’ला आणखी एका पर्यटन हंगामासाठी, म्हणजेच २०२६-२७ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. शॅकसाठी अर्ज करण्याची तारीख आणि शुल्कही निश्चित करण्यात आले आहेत.
पर्यटन खात्याने सध्याच्या बीच शॅक धोरणाला एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने शॅक व्यवसायातील सातत्य कायम राहणार आहे. आगामी पर्यटन हंगामासाठी राज्यातील प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सेवेसाठी शॅक उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात येणार आहे.
पर्यटन खाते १० सप्टेंबरपासून शॅकचे परवाने देण्यास सुरुवात करणार आहे. पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच शॅक सुरू करता यावेत, यासाठी नूतनीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जाणार आहे. प्रशासकीय अडथळे दूर करून शॅकधारकांना त्यांचा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्याची हमी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
मागील पर्यटन हंगामात निर्माण झालेली आर्थिक अनिश्चितता आणि प्रतिकूल व्यावसायिक परिस्थिती लक्षात घेऊन शॅक चालकांना दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे यंदा शॅक शुल्काच्या रचनेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
दरम्यान, ‘गोवा रजिस्ट्रेशन ऑफ टुरिस्ट ट्रेड (सुधारणा) कायदा, २०२६’च्या माध्यमातून महत्त्वाचा नियामक बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सीआरझेड क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व खासगी शॅकची पर्यटन खात्याकडे नोंदणी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
गोव्यातील समुद्रकिनारी पर्यटन व्यवसाय कायदेशीर चौकटीत चालतो याची खात्री करण्यासोबतच खासगी शॅक व्यवसायावर अधिक देखरेख आणि जबाबदारी निश्चित करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असल्याचे पर्यटन खात्याने स्पष्ट केले आहे.


