ऑगस्ट महिन्यात ८८६ जणांची ‘डेंग्यू एनएस वन’ चाचणी पॉझिटिव्ह

४९ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट : दक्षिण गोव्यात ४६ जणांना बाधा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
09th September, 11:14 pm
ऑगस्ट महिन्यात ८८६ जणांची ‘डेंग्यू एनएस वन’ चाचणी पॉझिटिव्ह

पणजी : राज्यात ऑगस्ट महिन्यात ८८६ जणांची डेंग्यू एनएस वन चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यातील ४९ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर गोव्यात ३४५ जणांची चाचणी करण्यात आली. यातील ३ जणांना डेंग्यूची बाधा झाली होती. दक्षिण गोव्यात ५४१ पैकी ४६ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे आढळले होते. आरोग्य खात्यातर्फे एनएस १ चाचणी केलेल्या सर्व रुग्णांवर डेंग्यूसाठीचे उपचार केले जातात. ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. सततच्या ऊन पावसामुळे डासांची पैदास अधिक झाली. यामुळे रुग्णसंख्या वाढल्याची माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात सप्टेंबर तसेच मे महिन्यात डेंग्यूचे रुग्ण तुलनेने अधिक प्रमाणात आढळतात. मे महिन्यात पाण्याच्या कमतरतेमुळे पाणी चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवले जाते. अशावेळी पाण्यात डासांची उत्पत्ती होते. सप्टेंबर महिन्यात पावसासह ऊन देखील असते. यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होते. राज्यात जुलै महिन्यात

८८१ जणांची एनएस वन चाचणी करण्यात आली होती. यातील ७ जणांना बाधा झाल्याचे आढळले होते. डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी खात्यातर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांत वाढ करण्यात आली आहे. यानुसार हॉटस्पॉटसह अन्य भागात दर आठवड्याला डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यात येत आहेत. याशिवाय स्वच्छता मोहीम, जागृती, तपासणी करणे आदी उपाय करण्यात येत आहेत. डासांचे प्रमाण अधिक होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी देखील आपल्या घराची, परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. घरातील कुंड्या, फ्रिज किंवा अन्य ठिकाणी साचून राहिलेले पाणी सहा दिवसांतून एकदा साफ करणे आवश्यक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.