साखळी : १९ वर्षांपूर्वी न्यायालयीन लढा देऊन सुर्ल ग्रामकृती समिती, ग्रामपंचायत आणि इतरांनी खाण कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई दाखल मिळविलेला निधी काही तांत्रिक अडचणींमुळे सरकारदरबारी पडून होता. कोटींच्या घरात असलेली ही रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांना दिलेल्या आदेशानुसार प्रभावी पाठपुरावा व सोपस्कार झाल्याने त्याचा शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी लाभ मिळाला.
सुर्ल येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सुर्लतील ७० शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे धनादेश वितरीत करण्यात आले.
या नुकसानभरपाईचा लाभ मिळावा यासाठी सुर्ल येथील सरकारी माध्यमिक विद्यालयच्या सभागृहात खास सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सुविधा शिबिराचा लाभ घेऊन आपली कागदपत्र सादर करणाऱ्या सुमारे ७० शेतकऱ्यांना २ कोटी ९० लाख रुपयांचे धनादेशपत्र देण्यात आले असून उर्वरित शेकाऱ्यांनी आपले पैसे मिळविण्यासाठी सोपस्कार पूर्ण करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सुर्ल येथील श्री सिद्धेश्वर मंदिर सभागृहात आयोजित या कार्यक्रमास व्यासपीठावर डिचोली उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, अॅड. जोशी, सरपंच सुचिता गावकर, उपसरपंच सुभाष फोंडेकर, भाजप महिला प्रभारी सुलक्षणा सावंत, पंच विश्रांती सुर्लकर, भोला खोडगीणकर, साहिमा गावडे, शाणू सुर्लकर, ग्रामकृती समिती सदस्य नारायण सोननाईक, प्रकाश फोंडेकर यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन मंगलदास उसगावकर यांनी केले.
जनतेच्या विश्वासामुळेच सर्व घटकांसाठी कार्य!
साखळी मतदारसंघातील जनतेने आपणावर ठेवलेल्या विश्वासाच्या बळावरच आपण मतदारसंघातील विकास व सर्व घटकांच्या कल्याणाचे काम करू शकत आहे. आज मुख्यमंत्री असल्याने या कामाला गती देऊन ते यशस्वी करण्यात आपणास यश आले. या कामाकडे यापूर्वी कोणीही पाहिले नव्हते. आज ७० शेतकऱ्यांना धनादेश पत्रे वितरीत केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत निवडून येऊन पुन्हा मुख्यमंत्री बनल्यावर लगेच दुसरा नुकसानभरपाईचा हप्ता शेतकऱ्यांना वितरीत करू, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.


