पैंगीण : पर्तगाळी, पैंगीण येथील पर्तगाळी मठात विद्यमान प. पू. श्रीमद् विद्याधिश तीर्थ स्वामी महाराज यांच्या संकल्पनेतून जीवोत्तम विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या या विद्यापीठात गोवा व कर्नाटकातील मिळून २६ विद्यार्थी प्रथम व द्वितीय वर्गात संस्कृत शिक्षण घेत आहेत.
जीवोत्तम विद्यापीठ ही केवळ वास्तू नसून गुरु-परंपरेच्या आशीर्वादातून विकसित झालेली ज्ञानभूमी आहे. विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञानात प्रावीण्य मिळवतानाच विनय, गुरुभक्ती आणि गीतेचे अध्ययन आत्मसात करावे, अशी स्वामी महाराजांची भूमिका आहे.
शास्त्र निपुणतेबरोबरच भक्ती, संस्कार आणि समाजाला योग्य दिशा देण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, हा विद्यापीठाचा उद्देश आहे. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था मठाच्या वतीने करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नुकतेच शैक्षणिक साहित्याचे संचही देण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त अध्यापकांच्या निवास व भोजनाची व्यवस्थाही मठातर्फे करण्यात आली आहे.या विद्यापीठातील अभ्यासक्रम साधारणपणे पाच वर्षांचा आहे. संस्कृत आणि शास्त्राधारीत शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जात आहे.


