पर्वरीतील उड्डाणपुलाचे फीत कापून लोकार्पण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. सोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खा. सदानंद शेट तानावडे, मंत्री दिगंबर कामत व इतर. (नारायण पिसुर्लेकर)
गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : फोंडा-भोम रस्त्याच्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होऊन हा रस्ता २०२८ पर्यंत पूर्ण केला जाईल. भोम गावातील मंदिर वाचविण्यासाठी खास बो-स्ट्रिंग पुलासह लगतच्या तलावाचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
मी आतापर्यंत रस्ते बांधकामाचे सात विक्रम केले आहेत. आता कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा विक्रम करणार आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
५.१५ किलोमीटर लांबीच्या पर्वरी उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, सभापती गणेश गावकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, इतर मंत्री, आमदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडकरी यांच्या हस्ते फीत कापून, दीपप्रज्वलन करून व रिमोट कंट्रोलचे कळ दाबून उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
मंत्री गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गावरील जुने गोवा ते भोम या रस्त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मंदिर वाचविण्यासाठी ७६ मीटर लांबीच्या बो-स्ट्रिंग पुलाचा प्रस्ताव ठेवला असल्याचे गडकरी यांनी सांगितले. या कामासाठी एजन्सी निश्चित करण्यात आली आहे.
बोरी पूल तसेच मोले-खांडेपार रस्त्याच्या चौपदरीकरणाला मंजुरी देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी केली. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांचीही भाषणे झाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले...
अनमोड घाट ते मोले रस्त्यासाठी ४,२०० कोटी रुपये आणि बोरी पुलासाठी २,००० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. झाडे तोडण्याची परवानगी न मिळाल्याने राज्यातील सहा रस्ते प्रकल्पांची कामे सुरू झालेली नाहीत. गोवा सरकारने बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा.
महामार्गाच्या दुतर्फा योग्य प्रकारची झाडे लावून हरित महामार्ग तयार करावा आणि प्रदूषणाचे प्रमाण कमी करावे. पर्यटकांसाठी महामार्गालगत खाद्यपदार्थांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवावीत. योग्य प्रकारचे इंधन वापरून प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे.
जगातील सर्वोत्तम कामे आपल्या देशात झाली पाहिजेत. आयफेल टॉवर पाहिल्यानंतर मला जुवारी पुलावर ऑब्झर्व्हेटरी टॉवर उभारण्याची कल्पना सुचली. या टॉवरवरील व्ह्यूइंग गॅलरीमध्ये गोव्याची संस्कृती, कला आणि वारसा यांचे दर्शन घडविणाऱ्या उत्कृष्ट कलाकृती असाव्यात.
गोव्यात आपण अनेक कामे केली आहेत. त्यामुळे गोव्यातून निवडणूक लढविण्याचा विचार आहे का, असा प्रश्न पत्रकार मला विचारतात. माझ्याकडे अनेकांकडून निवडणूक लढविण्याचे प्रस्ताव आले आहेत. मात्र, मी नागपूरमधूनच निवडणूक लढवणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यास बराच विलंब झाला आहे. त्याचे लोकार्पण करण्यास मला लाज वाटते. महामार्गाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात गाडीने प्रवास करून महामार्गाची पाहणी करणार आहे. कामाला विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असून, हादेखील एक विक्रम असेल.
आयआयएम नागपूर करणार अपघातप्रवण क्षेत्रांचा अभ्यास : मुख्यमंत्री
आयआयएम नागपूर आणि सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. आयआयएम नागपूरकडून वाहतूक व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यातील अपघातप्रवण क्षेत्रांचा अभ्यास करून सहा महिन्यांत अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. जुवारी पुलावर उभारण्यात येणाऱ्या ऑब्झर्व्हेटरी टॉवरच्या कामाचा शुभारंभ नितीन गडकरी यांच्या हस्ते झाल्याचेही त्यांनी सांगितले. पर्वरी उड्डाणपुलावरून ११ सप्टेंबरपासून वाहतूक सुरू होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
१२ वर्षांत १६,७६३ कोटींची कामे मंजूर
गेल्या १२ वर्षांत गोव्यात १६,७६३ कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. त्यापैकी ९,१५५ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून ७,६०८ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. अनमोड घाट-मोले रस्ता आणि बोरी पुलाचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.


