वास्को : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाबोळी मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. चिखलीचे सरपंच कमला प्रसाद यादव यांनी सुरू केलेल्या ‘गोमती महिला गृह उद्योग’ (GMGU) उपक्रमाच्या उद्घाटना वेळी काही विद्यमान तसेच माजी पंचसदस्य आणि सरपंचांनी यादव यांना दाबोळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आवाहन केले. तसेच त्यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
कमला प्रसाद यादव यांच्या पत्नी तथा चिखलीच्या पंचसदस्य सुनीता यादव यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या पत्नी अनघा आर्लेकर, ग्रामीण विकास अधिकारिणीच्या अधिकारी दीपाली नाईक, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्षा अनिता थोरात यांच्यासह विद्यमान व माजी पंचसदस्य, सरपंच, महिला आणि मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान अनेक पंचसदस्य आणि सरपंचांनी कमला प्रसाद यादव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत दाबोळीमधून निवडणूक रिंगणात उतरावे, अशी जाहीर मागणी केली. त्यांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा राहील आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महिला गृह उद्योगाच्या उद्घाटनाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले.
‘गोमती महिला गृह उद्योगा’च्या माध्यमातून महिलांना कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिलांना प्रशिक्षण देण्याबरोबरच बचत गटांना आवश्यक सहकार्य व साधने उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
याच उपक्रमाचा भाग म्हणून विविध स्वयं-सहायता गटांना शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच अगरबत्ती आणि साबण निर्मितीसाठी आवश्यक यंत्रांचेही वितरण करण्यात आले. त्यामुळे महिलांना घरातूनच लघुउद्योग सुरू करून उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यास मदत होणार आहे.
दाबोळी मतदारसंघातील महिलांसाठी मोफत वाहनचालक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. प्रशिक्षणासोबतच लाभार्थी महिलांना वाहनचालक परवाना मिळवून देण्यासाठीही संस्थेकडून सहकार्य केले जाणार आहे. यामुळे महिलांना अधिक स्वावलंबी होण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार
महिलांना आवश्यक कौशल्ये, साधने आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘गोमती महिला गृह उद्योग’ पुढेही विविध उपक्रम राबविणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


