नवी दिल्ली:
"सैर कर दुनिया की गाफ़िल जिंदगानी फिर कहाँ,
जिंदगी गर कुछ रही तो ये जवानी फिर कहाँ..."
हिंदी साहित्यातील ज्येष्ठ प्रयोगशील लेखक, कवी आणि प्रवासी सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन 'अज्ञेय' यांनी आपल्या प्रसिद्ध 'अरे यायावर रहेगा याद' या प्रवासवर्णनपर ग्रंथात प्रवासाचे एक सुरेख तत्त्वज्ञान मांडले होते. 'यायावर' म्हणजेच निरंतर भटकंती करणारा तो, जो कोणत्याही विशिष्ट उद्देशाशिवाय आणि बंधनांशिवाय केवळ प्रवासाच्या निखळ आनंदासाठी बाहेर पडतो. 'अज्ञेय' यांच्या या कालजयी विचारांचा प्रत्यय आजच्या आधुनिक भारतीय समाजात अगदी तंतोतंत येताना दिसत आहे. मागे पंतप्रधान मोदी देखील एका सभेला संबोधित करताना मिश्किलपणे म्हणाले होते की 'अरे! हम तो फकीर आदमी है; झोला लेकर चल पडेंगे!'. अर्थात त्यांच्या बोलण्याचा संदर्भ आणि कटाक्ष वेगळा असला तरी आजची पिढी हाच विचार घेऊन आपली एकूणच लाईफस्टाईल प्लान करताना दिसून येते.

भारतात पूर्वी पर्यटनाला जाणे म्हणजे उन्हाळी किंवा दिवाळीच्या सुट्ट्या, सण-उत्सव किंवा एखाद्या विशिष्ट प्रसंगाची वाट पाहणे, एवढेच सीमित गणित असायचे. मात्र, आता हा पारंपारिक ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे. 'बुकिंग डॉट कॉम' (Booking.com) च्या ‘समर ट्रॅव्हल रिसर्च २०२६’ या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष सिद्ध करतात की, भारतीय पर्यटक आता खऱ्या अर्थाने 'यायावर' बनले आहेत.
प्रवासाचे नवे तत्त्वज्ञान: बंधनमुक्त भटकंती
'अज्ञेय' यांनी लिहिले होते की, प्रवासाचा खरा आनंद आधीच ठरवलेल्या नियोजित आराखड्यात नसून अनपेक्षितता आणि उत्स्फूर्ततेमध्ये असतो. ते पुढे म्हणतात 'बहता पानी निर्मल है; एक जगह टिकना तो मौत है!' आजचा भारतीय पर्यटक नेमका हाच विचार प्रत्यक्ष जगताना दिसतोय. 'बुकिंग डॉट कॉम'च्या सर्वेक्षणातील ५८ टक्के पर्यटकांनी केवळ ‘आपल्याला प्रवास करायचा आहे’ या एकाच उत्कट इच्छेपायी सहली काढल्या, तर ५७ टक्के लोकांनी कोणत्याही विशेष प्रसंगाविना वर्षभरात २ ते ३ वेळा भटकंती केली.
नोकरीतील ताणतणाव घालवून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी ६१ टक्के लोकांनी निसर्गाचा आसरा घेतला. तसेच ५५ टक्के लोकांनी दैनंदिन कामकाजाच्या दिनक्रमातून ब्रेक घेत आलिशान हॉटेलमध्ये 'स्टेकेशन'चा आनंद लुटला, तर ५७ टक्के लोकांनी केवळ हवापालटासाठी शहराबाहेर पडणे पसंत केले.
घरगुती कटकटींपासून ते ब्रेकअपपर्यंत... ट्रिपची अनोखी कारणे!
'अरे यायावर रहेगा याद' मध्ये नमूद केल्याप्रमाणे, माणूस जेव्हा दैनंदिन जगण्याच्या चौकटीत गुदमरतो, तेव्हा प्रवास त्याला नवी दृष्टी आणि मोकळा श्वास देतो. आजच्या काळातही दैनंदिन कटकटींपासून सुटका मिळवण्यासाठी भारतीय नवनवीन निमित्ते शोधत आहेत. सुमारे २८ टक्के लोकांनी सासू-सासरे जास्त दिवस मुक्कामाला आल्यामुळे सहल आयोजित केली, तर ३५ टक्के लोकांनी जोडीदाराशी भांडण किंवा ब्रेकअप झाल्यानंतर मन हलके करण्यासाठी प्रवासाची वाट धरली.

याशिवाय, दूरच्या नातेवाईकांचे जेवण किंवा कंटाळवाणी लग्नकार्ये टाळण्यासाठी तब्बल ५० टक्के नागरिकांनी आधीच ट्रिप बुक करून पळ काढला. घरचा ड्रायव्हर किंवा कामवाली सुट्टीवर गेल्यावर ३० टक्के लोकांनी थेट हॉटेल्सचा मार्ग धरला, तर ४६ टक्के लोकांनी शेजाऱ्यांच्या घरातील नूतनीकरण आणि ड्रिलिंगच्या आवाजापासून वाचण्यासाठी बॅग भरल्याचे समोर आले आहे.

कार्यालयीन कामाच्या ताणातून सुटका मिळवण्यासाठी ४८ टक्के पर्यटकांनी ऑफिसच्या महत्त्वाच्या मीटिंग्स दरम्यान गुपचूप ट्रिपचे बुकिंग केले, तर ४५ टक्के लोकांनी काम करत असल्याचा आव आणत पर्यटन स्थळांचे फोटो पाहिल्याचे कबूल केले. 'बुकिंग डॉट कॉम'चे संतोष कुमार म्हणतात त्याप्रमाणे, प्रवास आता केवळ सण-उत्सवांशी जोडलेला राहिलेला नाही. 'अज्ञेय' यांच्या 'यायावरी' वृत्तीप्रमाणेच, आजचा भारतीय मानसिक शांतता, निवांतपणा आणि निखळ आनंदासाठी निमित्त मिळताच भटकंतीचा मार्ग निवडत आहे.


