पणजी : शुक्रवारी आझाद मैदानावर राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी संघटनांनी एक दिवसीय संप केला. हा संप युनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सतर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बँकांचे काम आठवड्यातील पाच दिवस करणे, पीएलआय योजना रद्द करणे व अन्य प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या. मागण्या पूर्ण न झाल्यास २८,२९ आणि ३० सप्टेंबर रोजी पुन्हा संप करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर २६ ऑक्टोबर नंतर बेमुदत संपाचा इशारा फोरमने दिला.
याबाबत फोरमचे संतोष हळदणकर यांनी सांगितले की, आजचा संप हा देशभरात केल्या जाणाऱ्या संपाचा एक भाग आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांना महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी काम करावे लागते. या दिवशी देखील सुट्टी मिळण्याबाबत आमच्या संघटनांनी यापूर्वी केंद्र सरकारसोबत बोलणी झाली आहे. आम्ही भारतीय बँकिंग संघटनेतर्फे आमची मागणी (आयबीए) केंद्र सरकारपर्यंत पोहोचवली होती. यानंतर अधिकारी आणि कामगार संघटनांची आयबीएची बोलणी झाली होती.
ते म्हणाले, यानंतर मार्च २०२४ मध्ये आम्हाला प्रत्येक शनिवारी सुट्टी देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतर दोन वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत आम्ही विविध केंद्रीय खात्यांकडे पाठपुरावा करत आहोत. आमची मागणी त्वरित पूर्ण केली जावी यासाठी आम्ही आज देशव्यापी संप पुकारला आहे. आम्ही प्रत्येक शनिवारी सुट्टी मागत असलो तरी त्या ऐवजी सोमवार ते शुक्रवार ४० मिनिटे अतिरिक्त काम करण्याची आमची तयारी आहे. याबाबत आम्ही लेखी स्वरूपात आयबीएला कळवले आहे.
आमच्या अधिकारांसाठी संघर्ष : मॅक्स परेरा
मॅक्स परेरा यांनी सांगितले की, आम्ही ग्राहकांची गैरसोय करण्यासाठी नव्हे तर आमच्या अधिकारांसाठी संघर्ष करत आहोत. ऑनलाइन, ॲप बँकिंग, एटीएम अशा सुविधा असल्यामुळे संपाच्या कालावधीत ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची आम्हाला खात्री आहे.


