जोयडा : गोवा-कर्नाटक आंतरराज्यीय मार्गावरील कणकुंबी तपासणी नाक्यावर अबकारी विभागाने मोठी कारवाई करत गोव्यातून कर्नाटकात जाणारा सुमारे ४०० लिटर गोवा मेड मद्यासह जप्त केले. कॅन आणि बाटल्यांमध्ये भरलेले हे मद्य भारत बेंझ' सहाचाकी वाहनाच्या मागील भागात तयार केलेल्या गुप्त कप्प्यात लपवून कर्नाटकात आणला जात होते. या कारवाईत वाहनासह एकूण १० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
१० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई झाली. गोव्याकडून कर्नाटकाकडे येणाऱ्या वाहनांची कणकुंबी नाक्यावर तपासणी सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भारत बेंझ वाहन अडवण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता मागील भागात एक विशेष पार्टिशन केल्याचे आढळले. या लपवलेल्या जागेत कॅन आणि बाटल्यांमध्ये भरलेला ४०० लिटर स्पिरिट सापडले. अबकारी अधिकाऱ्यांनी हा साठा आणि वाहन तात्काळ जप्त केले.
याप्रकरणी सिद्धाप्पा मारुती बेळ्ळीकुंपे (रा. माडमगेरी, ता. यरगट्टी, जि. बेळगाव) आणि मंजुनाथ हनमंतप्पा देसाई (रा. कडबी, ता. सौंदत्ती, जि. बेळगाव) यांच्याविरुद्ध कर्नाटक अबकारी कायदा १९६५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मद्याचा साठा नेमका कुठे जाणार होता?
तपासणी चुकवून ४०० लिटर मद्य नेण्यामागचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा साठा कोणासाठी होता, त्याचा वापर कशासाठी होणार होता आणि या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता सुरू आहे. ही कारवाई अबकारी निरीक्षक मल्लेशी उप्पार, बाळगौड पाटील, उपनिरीक्षक नुरुल्ला खान तसेच कर्मचारी गुंडू पूजारी, बसवराज विवेकी, प्रकाश नंदी आणि गृहरक्षक दलाच्या पथकाने केली.


