सिद्दिकी उर्फ सुलेमानशी निगडीत २७८ कोटींची जमीन ईडीकडून तात्पुरती जप्त

म्हापसा, तिसवाडीतील गवळी मौळामधील जमिनीचा समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th September, 10:41 pm
सिद्दिकी उर्फ सुलेमानशी निगडीत २७८ कोटींची जमीन ईडीकडून तात्पुरती जप्त

जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याच्याशी संबंधित म्हापसा आणि तिसवाडी येथील तब्बल २७८ कोटी १६ लाख रुपये किमतीची २.३६ लाख चौरस मीटर जमीन सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तात्पुरती जप्त केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणांतर्गत ईडीच्या गोवा विभागाने ही मोठी कारवाई केली असून, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता आहे.

२७८ कोटी १६ लाख रुपयांची जमीन तात्पुरती जप्तया कारवाईत म्हापसा आणि तिसवाडी येथील एकूण २ लाख ३६ हजार ८९४ चौरस मीटर जमिनीचा समावेश आहे. या सर्व मालमत्तेची बाजारभावाप्रमाणे किंमत २७८ कोटी १६ लाख ४६ हजार ८३७ रुपये असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.

यात म्हापसा येथील कोमोरसोडो (एकतानगर) मधील पीटी शीट क्रमांक ६७ आणि चलता क्रमांक २ मधील २०,८१९ चौरस मीटर जमिनीचा समावेश आहे. तसेच तिसवाडीतील गवळी मौळा येथील सर्वेक्षण क्रमांक ३६/०, ३७/० व ३८/० या तीन भूखंडांमधील २ लाख १६ हजार ७५ चौरस मीटर जमिनीचा समावेश आहे.

चार गुन्ह्यांच्या आरोपपत्रांच्या आधारे तपास

गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) जमीन बळकावल्याप्रकरणी नोंदवलेले दोन गुन्हे तसेच म्हापसा आणि वाळपई पोलिसांत नोंदवलेल्या प्रत्येकी एका गुन्ह्याच्या आरोपपत्रांच्या आधारे ईडीने पीएमएलए (मनी लाँडरिंग) अंतर्गत तपास सुरू केला होता.

या प्रकरणात मुख्य आरोपी सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याला १६ जुलै २०२६ रोजी मनी लाँडरिंग कायद्याच्या कलम १९ अंतर्गत अटक करण्यात आली होती. सध्या हा आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बनावट शिक्के अन् खोटे दस्तऐवज

सिद्दीकी उर्फ सुलेमान खान हा मुख्य सूत्रधार आणि सराईत गुन्हेगार असून त्याच्या गुन्ह्याची कार्यपद्धती तपासात उघड झाली आहे. बार्देश आणि वाळपई उपनिबंधक कार्यालयांचे बनावट शिक्के आणि सील वापरून त्याने जमिनीच्या प्रमाणित प्रती मिळवल्या. त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून मूळ मालकांची नावे हटवून जमिनी हडप केल्या.

त्याच्या आणि कॉस्मा डिमेलो यांच्यावर फसवणूक, तोतयेगिरी, बनावट कागदपत्रांचा वापर करण्यासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत, असे तपासात उघड झाले आहे.

१९८८ मध्ये मृत व्यक्तीला कागदोपत्री जिवंत दाखवले

म्हापशातील कोमोरसोडो मालमत्तेच्या बाबतीत, १९८८ मध्ये मरण पावलेल्या व्यक्तीला कागदोपत्री जिवंत दाखवून विक्रेता म्हणून उभे करण्यात आले आणि मालमत्ता सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याच्या नावावर हस्तांतरित केली गेली.

तसेच, गवळी मौळा येथील सर्व्हे क्रमांक ३६/० च्या संदर्भात जमिनीचे फेरफार करण्यासाठी समांतर बनावट कराराचा वापर करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा