पणजी: गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला गोव्यातील महिलांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने 'गोवा उज्ज्वला योजने'अंतर्गत निधी वितरित केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ३,००० रुपयांचा हप्ता वर्ग करण्यात आला. या योजनेचा शुभारंभ करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि ही योजना घराघरांत पोहोचवून दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचे स्पष्ट केले.
नागरी पुरवठा खाते आणि जनरल लेजर या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन हजारो अर्जांची छाननी पूर्ण केली आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील ३,००० रुपये जमा झाले असून त्यांना संदेश देखील प्राप्त झाले आहेत. आगामी आठ दिवसांच्या आत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल. दरम्यान, येत्या काळात असणारा बँकांचा संप आणि चतुर्थीच्या सुट्ट्यांमुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास ४-५ दिवसांचा विलंब होऊ शकतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
उज्ज्वला योजनेचे जुने आणि नवीन सर्व अर्ज वैध
योजनेच्या अर्जांबाबत उद्भवलेला गोंधळ दूर करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, जुने व नवीन सर्व अर्ज वैध आहेत. गॅस कनेक्शन पतीच्या नावे असले तरीही योजनेचा फॉर्म महिलांच्या नावेच भरून त्यांचाच बँक खाते क्रमांक देणे आवश्यक आहे. ज्या महिला गृह आधार किंवा दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना ही रक्कम अत्यंत सुलभतेने मिळेल. तसेच, गोवा उज्ज्वला योजनेचा लाभ घेतल्यामुळे 'गृह आधार' किंवा 'दयानंद सामाजिक सुरक्षा योजना' बंद होईल, या विरोधकांच्या अपप्रचारावर कोणीही विश्वास ठेवू नये; या सर्व योजना नियमितपणे सुरूच राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.


