नवी दिल्ली: भारतात कोट्यवधी महिलांना भेडसावणाऱ्या 'एंडोमेट्रिओसिस' (Endometriosis) या आजाराबाबत वैद्यकीय क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतीकारी शोध लागला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि मुंबईस्थित राष्ट्रीय महिला आरोग्य संशोधन संस्थेने (ICMR-NIRWoH) केलेल्या पहिल्या Genome-Wide अभ्यासानुसार, भारतीय महिलांमध्ये एंडोमेट्रिओसिस आजार उद्भवण्यासाठी जनुकीय घटक (Genetic Factors) मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरू शकतात आणि हा धोका अनुवांशिकही असू शकतो. पिढ्यानपिढ्या ज्या वेदनांकडे 'सामान्य समस्या' किंवा 'स्त्रियांचे दुखणे' म्हणून दुर्लक्ष केले गेले, त्या त्रासामागे ठोस वैज्ञानिक आणि जनुकीय कारणे दडलेली आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे.

वैज्ञानिक नियतकालिक 'सायंटिफिक रिपोर्ट्स' (Scientific Reports) मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासामुळे भारतीय महिलांमधील एंडोमेट्रिओसिस आजाराचे लवकर निदान, जोखीम अंदाज आणि भविष्यातील अचूक उपचारांच्या संशोधनाचा पाया रचला गेला आहे. जगभरात प्रजनन क्षमतेच्या वयातील सुमारे १० टक्के म्हणजेच २४.७ कोटी महिला या आजाराने ग्रस्त आहेत, तर एकट्या भारतात ही संख्या तब्बल ५ कोटींच्या आसपास आहे. या आजारात गर्भाशयाच्या अस्तरासारख्या ऊती गर्भाशयाबाहेर वाढतात, ज्यामुळे मासिक पाळीत तीव्र वेदना, ओटीपोटात तीव्र वेदना, संभोगाच्या वेळी त्रास, थकवा, नैराश्य, अस्वस्थता आणि वंध्यत्व यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात.

भारतीय डेटावर आधारित पहिला व्यापक अभ्यास
आत्तापर्यंत एंडोमेट्रिओसिसवरील बहुतेक संशोधन आणि उपचारांचे निकष हे पाश्चात्य देशांतील अभ्यासावर आधारित होते. मात्र, या नवीन संशोधनामुळे दक्षिण आशियाई महिलांमधील जनुकीय घटकांचा प्रथमच सखोल अभ्यास झाला आहे. देशातील पहिल्या मोठ्या जनुकीय अभ्यासात भारतीय महिलांमधील विशेष जनुकीय बदल स्पष्ट झाले असून, त्याच वेळी जागतिक स्तरावरील इतर देशांतील महिलांशी असलेले काही सामायिक जनुकीय धोकेही यात सिद्ध झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटना (WHO) सध्या या आजाराच्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे.

या अभ्यासात भारतीय महिलांमध्ये या आजाराशी संबंधित २१ संभाव्य जनुकीय भाग (Genetic Regions) शोधण्यात आले आहेत. यामध्ये १३ व्या गुणसूत्रावरील क्रोमोझोम भागाजवळ सर्वात मजबूत संकेत आढळले आहेत. याशिवाय जागतिक पातळीवर ज्ञात असलेल्या काही जनुकीय संकेतांचे अंशही भारतीय महिलांमध्ये आढळले आहेत. युरोपियन अभ्यासातून मिळालेले जनुकीय जोखीम गुणोत्तर भारतीय गटातही लागू होत असल्याचे यात दिसून आले आहे. हे निष्कर्ष सध्या लगेचच क्लिनिकल चाचण्यांसाठी वापरात येणार नसले तरी आजाराची जैविक रचना समजून घेण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहेत.
१८ केंद्रांचा सहभाग आणि राष्ट्रीय नेटवर्कची निर्मिती
हा संपूर्ण अभ्यास 'एंडोमेट्रिओसिस क्लिनिकल अँड जेनेटिक रिसर्च इन इंडिया' (ECGRI) या उपक्रमांतर्गत पार पडला. यासाठी भारतातील सार्वजनिक आणि खाजगी अशा एकूण १८ रुग्णालये व संशोधन संस्थांचा समावेश असलेले एक मोठे नेटवर्क तयार करण्यात आले होते. यात स्त्रीरोगतज्ज्ञ, लॅपरोस्कोपिक सर्जन, संशोधक आणि लॅब टीम्सचा सहभाग होता. देशातील विविध भौगोलिक प्रदेश आणि जनुकीय पार्श्वभूमी असलेल्या महिलांना या अभ्यासात समाविष्ट केले गेले. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे एंडोमेट्रिओसिसचे निदान निश्चित झालेल्या महिलांचे नमुने घेण्यात आल्याने या अभ्यासाची अचूकता अत्यंत उच्च दर्जाची आहे.

भारतात माहितीचा अभाव, जनजागृतीची कमी आणि विशेष वैद्यकीय सुविधांपर्यंत वेळेत न पोहोचणे यांमुळे महिलांना योग्य निदानासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागते. या अभ्यासाच्या माध्यमातून भारतामध्ये एंडोमेट्रिओसिस आजाराशी संबंधित वैद्यकीय व जनुकीय माहितीचा (Data) आणि बायोरेपॉझिटरीचा (Biorepository) देशातील सर्वात मोठा डेटाबेस तयार झाला आहे. ही यंत्रणा भविष्यात आजाराची सुरुवातीची लक्षणे ओळखणे, वेदनारहित किंवा नॉन-इन्व्हेसिव्ह निदान चाचण्या विकसित करणे आणि व्यक्तिगत वैद्यकीय उपचारांवर (Precision Medicine) संशोधन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.


