पर्वरी : पर्वरी येथील ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबारप्रकरणी कटात सहभागी असलेल्या चौघांना क्राईम ब्रांचने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अटकेची प्रक्रिया सुरू आहे. गोळीबार करणाऱ्यांची ओळख पटली आहे. मात्र ते सापडलेले नाहीत.

पोलीस लवकरच या प्रकरणी खुलासा करू शकतात. मुंबई, कर्नाटकात पोलिसांची पथके गेले काही दिवस तपास करत होती. या कटात सहभागी असलेल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

२८ ऑगस्ट रोजी रात्री ८.४७ वाजण्याच्या सुमारास पर्वरी येथील ’निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर कॅसिनोच्या परिसरातच गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर बचावासाठी नायक यांच्या सुरक्षारक्षकांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात कुणीही जखमी झाले नव्हते. मात्र, या घटनेनंतर एकच खळबळ माजली होती. एकूण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे दिला होता.
दोघांचे चेहरे सीसीटीव्हीत दिसत होते
दरम्यान, गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला होता. घटनेनंतर लगेच वरीष्ठ पोलीस अधिकारी पर्वरीतील ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोकडे दाखल झाले होते. याठिकाणी पाहणी करून एकूण गोळीबारप्रकरणाची माहिती जाणून घेतली होती. घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर पोलीस पथके मुंबई, कर्नाटक इत्यादी ठिकाणी पाठवण्यात आली होती. गोळीबार करताना व नंतर पळून जाताना दोघांचे चेहरे सीसीटीव्हीत टिपले गेले होते. गोळीबारानंतर दोघे धावत दुचाकीकडे जात असल्याचे व दुचाकीवरून पळून जाताना त्यात दिसत होते. त्यानंतर कारमधून दोघेही पुढे पसार झाल्याचे तपासात पुढे आले होते.
गोळीबार करणाऱ्यांची ओळख पोलिसांना पटली
एकूण या माहितीवरून पोलिसांचा तपास सुरू होता. याप्रकरणी आता कटात सहभागी असलेल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलीस अधिक माहिती घेत आहेत. गोळीबार करणाऱ्यांची ओळख पोलिसांना पटली आहे. मात्र ते सापडले नसले तरी त्यांचा शोध सुरू आहे. त्यांना लवकरच गजाआड करणार असल्याचा विश्वास क्राईम ब्रांचने व्यक्त केला आहे.


