गोव्यात अनमोड घाटासह विविध भागांत अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

गोव्यात अनमोड घाट, पणजी, वेर्णा आणि कदंब बायपास परिसरात रस्ते अपघात घडले. अनमोड घाटात कंटेनर उलटून दोघे जखमी झाले, तर इतर ठिकाणी सुदैवाने जीवितहानी टळली असून वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
18 mins ago
गोव्यात अनमोड घाटासह विविध भागांत अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

पणजी: गोव्यात काल रात्री पासूनच विविध ठिकाणी रस्ते अपघातांची एक मालिका पाहायला मिळाली असून अनमोड घाट, पणजी शहर, वेर्णा आणि जुने गोवे येथील कदंब बायपास परिसरात अपघात घडले आहेत. अनमोड घाटात घडलेल्या गंभीर अपघातात मालवाहू कंटेनरचे अचानक ब्रेक फेल होऊन गाडी उलटल्याने दोघे जण जखमी झाले आहेत, तर इतर ठिकाणच्या अपघातांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. 

आज सकाळी अनमोड घाटातील एका धोकादायक वळणावर अपघाताची घटना घडली. गोव्याच्या दिशेने येणाऱ्या एका मालवाहू कंटेनरचे अचानक ब्रेक फेल झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा कंटेनर रस्त्यावरच पलटी झाला. अपघाताच्या वेळी वाहनात चालक आणि क्लीनर असे दोघेच उपस्थित होते. या घटनेत दोघेही जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच कुळे पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे घाटातील अरुंद रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली.

दुसरी घटना जुने गोवे ते पणजी जोडणाऱ्या मुख्य महामार्गावरील कदंब पठार परिसरात घडली. जुने गोवेच्या दिशेने जाणाऱ्या निळ्या रंगाच्या एका चारचाकी कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यावरील दुभाजक आणि पथदीपाच्या खांबाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचे व इंजिनचे मोठे नुकसान झाले असून रस्त्यावर तेल सांडले होते. सुदैवाने या अपघातात चालक व प्रवासी सुखरूप बचावले. याशिवाय पणजीतील जुन्या सचिवालयाजवळ एका वाहनाचा स्वयंअपघात झाला. ही घटना काल रात्री घडली. तर वेर्णा येथे एका मालवाहू गाडीने रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक दिली. या सर्व घटनांमध्ये वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 


हेही वाचा
सर्व पहा