म्हापसा: गणेशोत्सव सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बाजारात खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, महागाईच्या तीव्र झळांमुळे सणाचा खर्च भागवताना सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असल्याचे चित्र आहे. अशा काळात समाजातील गरजू आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी म्हापशातील सामाजिक कार्यकर्ते योगेश केळकर यांनी पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 'अवघ्या १० रुपयांत ५ नारळ' उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य आणि दिलासादायक उपक्रम राबवला असून, म्हापसावासीयांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
निस्वार्थ वृत्तीने सामाजिक सेवा बजावणारे योगेश केळकर गेल्या ७ वर्षांपासून चतुर्थीच्या काळात असा अनोखा उपक्रम राबवत आहेत. सणाच्या दिवसांत बाजारात फळे, केळी, सफरचंद, अननस, फरसाण आणि नारळ यांसारख्या आवश्यक पूजा साहित्याचे भाव गगनाला भिडलेले असतात. अशा वेळी व्यापारी नफ्याचा विचार न करता, सर्वसामान्य नागरिकांना रास्त आणि अल्प दरात सणाचे साहित्य मिळावे यासाठी केळकर सातत्याने कार्यरत असतात.

यंदा बाजारात नारळाचे दर प्रचंड वाढलेले असताना, त्यांनी म्हापसा बँकेसमोर असलेल्या शांतादुर्गा निवास (बी-विंग अपार्टमेंट, दुकान क्र. ६) येथे ९ सप्टेंबर ते १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत विशेष स्टॉल उभारून प्रति व्यक्ती केवळ १० रुपयांत ५ नारळांची (म्हणजेच २ रुपयांत १ नारळ) विक्री करण्याचा उपक्रम राबवला आहे. सवलतीच्या दरातील हे उत्तम प्रतीचे नारळ मिळवण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी सायंकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या होत्या.आजही यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

या उपक्रमाविषयी माहिती देताना योगेश केळकर यांनी सांगितले की, ते गेल्या ७ वर्षांपासून सणांच्या काळात केवळ २ रुपयांत नारळ विक्रीचा उपक्रम राबवत आहोत. प्रति व्यक्ती १० रुपयांत ५ याप्रमाणे उत्तम आणि मोठ्या आकाराचे नारळ उपलब्ध करून दिले जात आहेत. दरवर्षी आम्ही साधारण ९ ते १० हजार नारळ नागरिकांना देतो. वाढत्या महागाईच्या काळात लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळावा हाच यामागील मुख्य उद्देश असून यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही, ही निव्वळ समाजसेवा आहे असेही ते म्हणाले.

या सामाजिक उपक्रमाचे आणि योगेश केळकर यांच्या कार्याचे म्हापसा येथील श्री शांतादुर्गा देवस्थानाचे अध्यक्ष रोहन धावजेकर यांनी विशेष कौतुक केले आहे. या प्रसंगी बोलताना धावजेकर म्हणाले की, आजच्या काळात कोणत्याही स्वार्थाशिवाय किंवा राजकीय हेतूशिवाय लोकांसाठी निस्वार्थपणे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अत्यंत दुर्मिळ झाले आहेत. अशा परिस्थितीत योगेश केळकर गेली ७ वर्षे सातत्याने हा उपक्रम चालवत आहेत, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. चतुर्थीच्या काळात बाजारात नारळाचे भाव गगनाला भिडलेले असताना अवघ्या २ रुपयांत १ याप्रमाणे १० रुपयांत ५ उत्तम नारळ देणे ही साधी गोष्ट नाही.

रोहन धावजेकर यांनी पुढे स्पष्ट केले की, या उपक्रमामुळे म्हापसा परिसरातील शेकडो गरजू आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना थेट आर्थिक मदत होते. सणाच्या तोंडावर आवश्यक वस्तू इतक्या सवलतीच्या दरात मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजातील इतर घटकांनाही सामाजिक दायित्व जपण्याची आणि निस्वार्थ भावनेने एकत्र येण्याची प्रेरणा मिळते. या उपक्रमाच्या ठिकाणी रोहन धावजेकर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिकांनी भेट देऊन आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.


