नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांच्या चेहऱ्याचा आणि आवाजाचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून गैरवापर करून बनावट गुंतवणूक योजनांचा प्रचार करणारे डीपफेक व्हिडिओ सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियंका गांधी यांच्या कार्यालयाने याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रियंका गांधी गुंतवणूक करण्याचे आवाहन करत असल्याचे भासवणारे एआय-निर्मित व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. हे व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहेत. त्यामागे आर्थिक फसवणुकीचा हेतू असल्याचे त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये किंवा त्यात पैसे गुंतवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
बनावट व्हिडिओतून विश्वास संपादनाचा प्रयत्न
सुप्रसिद्ध व्यक्तींचा चेहरा आणि आवाज वापरल्याने बनावट गुंतवणूक योजना खरी असल्याचा भास निर्माण होतो. सुरुवातीला कमी रकमेवर आकर्षक परतावा दाखवून नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर मोठी रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त केले जाते. पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर अतिरिक्त शुल्क किंवा कराच्या नावाखाली आणखी रक्कम मागितली जाते किंवा पैसे काढण्याची सुविधा बंद केली जाते.
डीपफेकच्या माध्यमातून वाढतेय आर्थिक फसवणूक
भारतात एआ-आधारित आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अलीकडे पुण्यात एका ३८ वर्षीय परिचारिकेची डीपफेक व्हिडिओच्या माध्यमातून चार लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा एआय-निर्मित व्हिडिओ वापरल्याचा आरोप आहे.
पुण्यातील व्यावसायिकाची १.०७ कोटींची फसवणूक
याच प्रमाणे पुण्यातील एका व्यावसायिकाची सुमारे १.०७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरणही समोर आले. यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बनावट एआय व्हिडिओ वापरून गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आल्याचे तपासात समोर आले.
कर्नाटकात ट्रम्पच्या व्हिडीओद्वारे २०० जणांची फसवणूक
कर्नाटकातही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एआय-निर्मित व्हिडिओ दाखवून कथित हॉटेल गुंतवणूक योजनेच्या नावाखाली २०० हून अधिक नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे.
गुंतवणुकीपूर्वी ‘ही’ काळजी घ्या
सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲपवर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा व्हिडिओ दिसला म्हणून तो खरा असल्याचे गृहीत धरू नये. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती देणे आणि अवास्तव परताव्याचे आश्वासन देणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे टाळावे.
बनावट ट्रेडिंग ॲप्स, सोशल मीडिया जाहिराती, खोटे तज्ज्ञ आणि बनावट नफा दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढले जात असल्याने गुंतवणूकदारांनी अधिक सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अल्पावधीत मोठा आणि हमखास परतावा देण्याचे आश्वासन हे फसवणुकीचे प्रमुख संकेत मानले जात आहेत.


