टूर पॅकेजच्या नावाखाली पर्यटकाची फसवणूक

बीट्रिक्स हॉलिडेज कंपनीच्या मालकाला अटक

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
टूर पॅकेजच्या नावाखाली पर्यटकाची फसवणूक

म्हापसा : पर्यटन टूर पॅकेज देण्याच्या नावाखाली केरळमधील एका पर्यटकाची ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाने (ईओसी) बीट्रिक्स हॉलिडेज प्रा. लि.चे मालक गौरेश रत्नाकर शिरोडकर (४८, रा. व्हडलेभाट-डोंगरी, तिसवाडी) याला अटक केली. त्याचा भाऊ गीतेश शिरोडकर हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.हा फसवणुकीचा प्रकार हणजूण येथे १९ डिसेंबर २०२५ पूर्वी घडला. कोझिकोडे, केरळ येथील अक्षय एम. व्ही. यांनी ईओसीकडे तक्रार दिल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी बीट्रिक्स हॉलिडेज आणि गोवा लाईफ व्हेकेशन या कंपन्यांच्या माध्यमातून भारत तसेच परदेशातील हॉटेल्सशी संलग्न टूर पॅकेज देण्याचे आमिष दाखवून पर्यटकाकडून ९१ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३८ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईओसीचे पोलीस निरीक्षक राहुल परब व रजाशाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर यांच्या पथकाने गौरीश शिरोडकर याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
सेवा न देता रक्कमही परत केली नाही
भारतातील आणि परदेशातील विविध हॉटेलशी लिंक असलेले टूर पॅकेज प्रदान करण्यासाठी सेवा लाभांसह लाभ घेण्यासाठी फिर्यादींनी ९१ हजारांचे हे पॅकेज घेतले‍. मात्र, पॅकेज घेतल्यानंतर प्रत्यक्षात लाभ घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी कोणतीही टूर सेवा दिली नाही. तसेच घेतलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पर्यटकाने ईओसीकडे तक्रार केली.

हेही वाचा
सर्व पहा