मोजी : विद्यमान चॅम्पियन भारताने गुरुवारी महिला ज्युनिअर आशिया कप २०२६ च्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. चीनमधील मोजी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा तब्बल १९-० अशा गोलफरकाने लाजीरवाणा पराभव केला. या दणदणीत विजयासह भारतीय संघाने स्पर्धेत आपले वर्चस्व अधिक मजबूत केले आहे.
सामन्याची सुरुवात झाल्यापासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानवर पूर्णपणे दडपण राखले. सामन्याच्या ७ व्या मिनिटाला पूजा साहूने पहिला गोल करत भारताचे खाते उघडले आणि विजयाचा पाया रचला. यानंतर सानिका मानेने दोन गोल नोंदवले. पहिल्या सत्रात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी बचावातील त्रुटींचा पुरेपूर फायदा उठवत विश्रांतीपर्यंत १०-० अशी भक्कम आघाडी घेतली. पहिल्याार्धात पाकिस्तानला भारताचा वेग आणि आक्रमक खेळाचा कोणताही मुकाबला करता आला नाही.
मध्यंतरा नंतरही भारतीय संघाने आपला वेग कमी केला नाही. गतविजेत्या भारतीय मुलींनी उत्तरार्धातही आक्रमक खेळ कायम ठेवत गोल करण्याची मालिका सुरूच ठेवली आणि आणखी नऊ गोल नोंदवले. यामध्ये पूजा मलिकने शानदार खेळ करत आपली 'हॅटट्रिक' पूर्ण केली, तर सुप्रिया आणि पूर्णिमा यादव यांनी प्रत्येकी दोन गोल केले. भारतीय संघाच्या सततच्या आक्रमक चढायांमुळे पाकिस्तानला सावरण्याची किंवा प्रत्युत्तर देण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. संपूर्ण सामन्यात एकतर्फी खेळ करत भारताने १९-० अशा विक्रमी फरकाने सामना खिशात घातला.
तिसऱ्या सलग अंतिम फेरीवर भारताची नजर
या विजयापूर्वी भारताने जपान, मलेशिया आणि दक्षिण कोरियाचा पराभव करून गट फेरीत आपले पहिले स्थान निश्चित केले होते. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरिया आणि मलेशिया यांच्यातील विजेत्या संघाशी होईल. महिला ज्युनिअर आशिया कपच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघ आता पूर्णपणे सज्ज झाला आहे.


