ताश्कंद : भारतीय अंडर-२० फुटबॉल संघाने तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऐतिहासिक कामगिरी करत एएफसी यु-२० आशियाई कपच्या मुख्य स्पर्धेत धडक मारली आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे खेळल्या गेलेल्या ग्रुप-बी च्या शेवटच्या पात्रता फेरीत भारताने बांगलादेशचा ३-० असा दणदणीत पराभव केला. त्यानंतर उझबेकिस्तानने सीरियाचा ३-० ने पराभव केल्यामुळे भारताचे मुख्य स्पर्धेतील तिकीट निश्चित झाले. यापूर्वी भारताने २००६ मध्ये या स्पर्धेच्या मुख्य टप्प्यात सहभाग घेतला होता.
या पात्रता फेरीत भारताने एकूण तीन सामने खेळले. पहिल्या सामन्यात भारताने सीरियाचा १-० असा पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात उझबेकिस्तानकडून ०-४ ने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना भारतासाठी ‘करो या मरो’ स्वरूपाचा होता. बांगलादेशविरुद्ध ३-० ने विजय मिळवून भारताने ६ गुणांसह गटात दुसरे स्थान पटकावले. तसेच, आठ गटांमधील सात सर्वोत्कृष्ट उपविजेत्या संघांमध्ये स्थान मिळवून भारताने मुख्य स्पर्धेची पात्रता निश्चित केली.
बॉक्स
सामन्यातील रोमांचक क्षण
ताश्कंद येथील सामन्यात पहिल्या मिनिटापासून भारताने आक्रमक पवित्रा घेतला.
पहिला गोल: सामन्याच्या २५ व्या मिनिटाला डेनी मैतेई लैशरामने बांगलादेशच्या बचावपटूवर दबाव टाकत गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
दुसरा गोल: दुसऱ्या हाफमध्ये ६० व्या मिनिटाला ऋषिकांतच्या पासवर विशाल यादवने अप्रतिम 'ॲक्रोबॅटिक फिनिश' करत संघाचा स्कोअर २-० केला.
तिसरा गोल: मुख्य प्रशिक्षक महेश गवळी यांनी ७२ व्या मिनिटाला केलेल्या बदलाचा फायदा घेत, ७९ व्या मिनिटाला बदली खेळाडू मोहम्मद अरबाशने डाव्या पायाने जबरदस्त शॉट मारत गोल केला आणि भारताची आघाडी ३-० अशी मजबूत केली.
चीनमध्ये २०२७ मध्ये रंगणार मुख्य स्पर्धा
एएफसी २० वर्षांखालील आशियाई कपची मुख्य स्पर्धा आगामी २४ मार्च ते १० एप्रिल २०२७ दरम्यान चीन येथे खेळवली जाणार आहे. दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर भारताला आशियातील शीर्ष युवा संघांविरुद्ध खेळण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव मिळवण्याची मोठी संधी मिळणार आहे. पात्रता निश्चित झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी टीम हॉटेलबाहेर एकत्र येत एकच जल्लोष केला. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने खेळाडूंच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, भारतीय युवा फुटबॉलसाठी हा एक सुवर्णकाळ मानला जात आहे.


