नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धा, डायमंड लीग फायनलमधून बाहेर

भारताला मोठा धक्का : पायाच्या घोट्याला झाली गंभीर दुखापत

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
29th August, 11:03 pm
नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धा, डायमंड लीग फायनलमधून बाहेर

नवी दिल्ली : पायाच्या घोट्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे नीरज चोप्रा आगामी डायमंड लीगची अंतिम फेरी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ब्रुसेल्स येथे ४-५ सप्टेंबर रोजी होणारी डायमंड लीगची अंतिम फेरी आणि जपानमधील आजी-नागोया येथे होणारी २० वी आशियाई क्रीडा स्पर्धा यामुळे त्याला मुकावी लागणार आहे. या दुखापतीमुळे भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.
आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून भावना व्यक्त करताना नीरजने लिहिले की, कष्टाळू काळानंतर मला असे वाटले होते की, लुसाने येथे सीझनची सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर मला हवा असलेला वेग आणि लय परत मिळत आहे. दुर्दैवाने, त्यानंतर लगेचच प्रशिक्षणादरम्यान माझ्या घोट्याला लिगामेंट टियरची दुखापत झाली. डॉक्टर आणि माझ्या टीमसोबत चर्चा केल्यानंतर, आम्ही या सीझनच्या उर्वरित स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या दुर्दैवी निर्णयामुळे यंदाच्या मोसमातील त्याच्या उर्वरित स्पर्धांचा प्रवास संपुष्टात आला आहे.
नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या भालाफेक प्रकारातील पदकाच्या आशा आता इतर युवा खेळाडूंवर टिकून आहेत. नीरजच्या अनुपस्थितीत भारताकडून रोहित यादव आणि यश वीर सिंग हे खेळाडू मुख्य जबाबदारी पेलतील आणि त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल.
२८ वर्षीय नीरज चोप्रासाठी यंदाचा २०२६ चा हंगाम अतिशय संमिश्र राहिला आहे. पाठीच्या जुन्या दुखापतीमुळे दीर्घ विश्रांती घेतल्यानंतर त्याने दोहा डायमंड लीगधून शानदार पुनरागमन केले होते.
दोहा येथे त्याने ८५.६९ मीटर भालाफेक करत चौथे स्थान मिळवले होते. या स्पर्धेत श्रीलंकेचा रुमेश पाथिराज (८८.६८ मीटर), ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स (८६.३८ मीटर) आणि अमेरिकेचा कुर्टिस थॉम्पसन (८५.९९ मीटर) यांनी अनुक्रमे पहिली तीन स्थाने पटकावली होती. त्यानंतर ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरजने ८५.८३ मीटर भालाफेक करत चमकदार रौप्य पदक पटकावले. लुसाने डायमंड लीगमध्ये त्याने ८८.०५ मीटर लांब फेकत या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. या कामगिरीनंतर तो लय परत मिळवत असल्याचे दिसत होते, मात्र अचानक आलेल्या दुखापतीमुळे त्याचा हा विजयी रथ थांबला आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतरच्या एका पोस्टमध्ये त्याने आपल्या पुनरागामाचा संघर्ष मांडताना म्हटले होते की, गेल्या १० महिन्यांनी माझी अशा प्रकारे परीक्षा घेतली ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. अनेक दुखापतींमधून सावरणे, शरीराला पुन्हा ताकद देणे, आपली लय शोधणे आणि स्पर्धा करण्यासाठी उत्सुक असतानाही संयम राखणे शिकणे अतिशय कठीण होते. यावर्षी मला स्पर्धा खेळायला मिळतील की नाही, हे माहीत नसतानाही मी दररोज सराव करत होतो.
पूर्ण विश्रांती, पुनर्वसनावर भर
आता डायमंड लीग आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर नीरज चोप्रा आपले संपूर्ण लक्ष पूर्ण विश्रांती आणि वैद्यकीय मार्गदर्शनाखाली होणाऱ्या पुनर्वसनावर केंद्रित करणार आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचे नाव उंचावणाऱ्या या स्टार खेळाडूच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन तो पूर्ण ताकदीने मैदानावर परत येईल, अशी प्रार्थना त्याचे चाहते करत आहेत.
दुखापतींचे ग्रहण, खडतर प्रवास
२०१६ : नवी दिल्ली येथील फेडरेशन कपदरम्यान नीरजला पहिल्यांदा पाठीच्या दुखापतीचा सामना करावा लागला.
२०१७ : या वर्षात त्याला गंभीर मांडीच्या स्नायूंच्या समस्येने त्रस्त केले.
२०१९ : उजव्या कोपराच्या हाडांच्या समस्येमुळे त्याला यशस्वी आर्थ्रोस्कोपिक सर्जरी करावी लागली.
२०२२ : पुन्हा एकदा मांडीच्या दुखापतीमुळे त्याला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला मुकावे लागले.
२०२५ (सप्टेंबर) : पाठीच्या खालच्या मणक्याची गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला तब्बल १० महिने खेळापासून दूर राहावे लागले होते.

हेही वाचा
सर्व पहा