ॲमस्टेलवीन : एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा ५-३ असा पराभव केला आहे. या दणदणीत विजयामुळे भारताने दुसऱ्या फेरीत आपले स्थान पक्के केले असून पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ दाखवला. खेळाच्या ५ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर ११ व्या मिनिटाला अभिषेकने उत्कृष्ट ड्रिबलिंगचे प्रदर्शन करत शानदार फिल्ड गोल नोंदवून भारताची आघाडी २-० अशी वाढवली.
२१ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचा फायदा घेत आपला दुसरा आणि संघाचा तिसरा गोल डागला.
तीन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न सुरू केले. २२ व्या मिनिटाला हन्नान शाहीदने उत्कृष्ट मैदानी गोल करत पाकिस्तानचे खाते उघडले. सामन्याच्या २४ व्या मिनिटाला दोन्ही संघांकडून प्रत्येकी एक गोल झाला. भारताकडून अभिषेकने पुन्हा एकदा आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत वैयक्तिक दुसरा गोल केला, तर लगेचच पाकिस्तानच्या सुफियान खानने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत मध्यंतरापर्यंत धावसंख्या ४-२ अशी ठेवली.
मध्यंतरानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पुन्हा एकदा वर्चस्व मिळवले. ३४ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर हार्दिक सिंगने कोणताही चुकी न करता गोल करत भारताला ५-२ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
सामन्याच्या चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच (४६ व्या मिनिटाला) हन्नान शाहीदने पाकिस्तानसाठी तिसरा गोल करत सामन्यात रोमांच निर्माण केला. अखेरच्या मिनिटांत पाकिस्तानने गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र भारतीय बचावाने त्यांची ही संधी हुकवत ५-३ असा सामना खिशात घातला.
दुसऱ्या फेरीची स्थिती
दिवसाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने वेल्सचा ८-२ असा पराभव करत गटात अव्वल स्थान पटकावले. आता भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करणार असून, तिथे त्यांना नेदरलँड्स आणि अर्जेंटिना किंवा न्यूझीलंड यांच्यापैकी एका संघाचा सामना करावा लागेल.
गोल नोंदवणारे खेळाडू:
भारत (५): हरमनप्रीत सिंग (५’, २१’), अभिषेक (११’, २४’), हार्दिक सिंग (३४’)
पाकिस्तान (३): हन्नान शाहीद (२२’, ४६’), सुफियान खान (२४’)


