तालुकास्तरावर बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्र सुरू करणार

मुख्यमंत्री : ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना संधी

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
2 hours ago
तालुकास्तरावर बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्र सुरू करणार

पणजी : गोव्यात बुद्धिबळ खेळाला अधिक चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तालुकास्तरावर बुद्धिबळाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. बुद्धिबळाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य क्रीडा संचालनालयामार्फत दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कांपाल-पणजी येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलात गोवा बुद्धिबळ संघटनेच्या बुद्धिबळ अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी क्रीडा संचालक अजय गावडे, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
पणजीप्रमाणेच दक्षिण गोव्यातही स्वतंत्र बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला.
सध्या गोवा बुद्धिबळ संघटनेची तीन प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत. भविष्यात तालुकास्तरावरही प्रशिक्षण वर्ग सुरू करून गावागावांतील बुद्धिबळातील प्रतिभावंत खेळाडूंना घडविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा केंद्रांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गोवा बुद्धिबळ संघटनेच्या बुद्धिबळ अकादमीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र, राज्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
शिष्टाचारानुसार क्रीडा विभागाशी संबंधित कार्यक्रमात क्रीडामंत्र्यांची उपस्थिती अपेक्षित असते. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीमुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले. यावेळी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रमेश तवडकर यांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले.मुख्यमंत्री म्हणाले, क्रीडामंत्री रमेश तवडकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, पूर्वनियोजित आणि व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही. त्यांनी सर्वांना आपल्या शुभेच्छा पाठवल्या आहेत.
राजकीय चर्चांना उधाण
अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या घडामोडींमुळे रमेश तवडकर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीला राजकीय कारणांची जोड दिली जात आहे. मात्र, या संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीनुसार, कार्यक्रमाच्या वेळी क्रीडामंत्री रमेश तवडकर हे काणकोण मतदारसंघात पूर्वनियोजित कामकाजात व्यस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीमागे कोणतेही अधिकृत राजकीय कारण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा
सर्व पहा