युवराज सिंगचे चर्चेचे आवाहन : रुपल-रितिका, संजना, देविशा यांच्या संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली: दिल्लीत ‘कॉक्रोच जनता पार्टी’ आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने आयोजित आंदोलनावर झालेल्या लाठीमार आणि अश्रूधुराच्या वापरावरून आता क्रीडा जगतातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि होणाऱ्या पत्नींनी सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष कारवाईचा निषेध केला असून, माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतर-मंतरवरून संसदेवर निघालेल्या मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली होती.
क्रीडा क्षेत्रातील प्रमुख प्रतिक्रिया
रितिका सजदेह (रोहित शर्माची पत्नी) : माजी कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका हिने एका ९ वर्षांच्या बालकाचा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते लहान मूल ‘पोलिसांच्या लाठीमाराला घाबरत नाही आणि भगतसिंगांपासून प्रेरणा घेतो’ असे म्हणताना दिसत आहे.
युवराज सिंग : दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या युवराज सिंगने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे आवाहन केले. ‘प्रत्येक विद्यार्थ्याला, नागरिकाला सुरक्षित वातावरणात शिकण्याचा आणि स्वप्ने पूर्ण करण्याचा अधिकार आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी चर्चेतूनच शांततापूर्ण मार्ग निघू शकतो,’ असे त्याने लिहिले.
देविशा शेट्टी (सूर्याकुमार यादवची पत्नी) : देविशाने आंदोलनावरील कारवाईवर भाष्य करताना लिहिले, सरकारवर टीका करणे, प्रश्न विचारणे आणि आंदोलन करणे ही लोकशाहीची ताकद आहे. मात्र हिंसेला लोकशाहीत स्थान नाही.
संजना गणेशन (जसप्रीत बुमराहची पत्नी) : प्रसिद्ध सूत्रसंचालक आणि बुमराहची पत्नी संजना हिने अश्रूधुराच्या वापराचा तीव्र निषेध केला. कोणत्याही लोकशाहीत लहान मुलांवर अश्रूधूर सोडणे सामान्य बाब मानली जाऊ शकत नाही. ज्यांच्याकडे संरक्षणाची जबाबदारी आहे, त्यांचीच भीती नागरिकांना वाटणे दुर्दैवी आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.
प्रिया सरोज थेट आंदोलनात
एकीकडे क्रिकेटपटूंच्या पत्नी सोशल मीडियावरून भाष्य करत असताना, क्रिकेटपटू रिंकू सिंगची होणारी पत्नी आणि मच्छलीशहर (उत्तर प्रदेश) येथील समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांनी जंतर-मंतर येथील आंदोलनात थेट सहभाग घेतला. त्या वरिष्ठ नेत्यांसोबत विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.