पहिल्या उपांत्य सामन्यात फ्रान्सचा २-० ने पराभव; एम्बाप्पेचे स्वप्न भंगले

डॅलस : सकस सांघिक खेळ आणि आक्रमक रणनीतीच्या जोरावर स्पेनने फुटबॉल विश्वचषक २०२६ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात बलाढ्य फ्रान्सचा २-० असा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक विजयासह स्पेनने तब्बल १६ वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
डॅलस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्पेनकडून मिकेल ओयारझाबाल आणि पेड्रो पोरो यांनी गोल करत संघाला शानदार विजय मिळवून दिला. दुसरीकडे, फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बाप्पे या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने फ्रान्सचे सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचे आणि विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याचे स्वप्न भंगले आहे.
स्पेनने यापूर्वी २०१० च्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठली होती, जिथे त्यांनी नेदरलँड्सचा १-० ने पराभव करत आपले पहिले आणि एकमेव विश्वचषक विजेतेपद पटकावले होते. आता तब्बल १६ वर्षांनंतर स्पेनला पुन्हा एकदा सुवर्ण इतिहास रचण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
ओयारझाबालच्या पेनल्टीने मिळवून दिली आघाडी
सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमणे करण्यास सुरुवात केली. मात्र, सामन्याच्या २२ व्या मिनिटाला स्पेनला एक मोठा फायदा मिळाला. स्पेनचा युवा स्टार खेळाडू लॅमिन यामाल हा बॉक्समध्ये चेंडूवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असताना फ्रान्सचा डिफेंडर लुकास डिग्ने याने त्याला चुकीच्या पद्धतीने रोखण्याचा (फॉऊल) प्रयत्न केला. डिग्ने चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी गेला खरा, पण त्याच वेळी यामालने डिग्नेच्या मागून येत चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि डिग्नेचा पाय यामालला लागला. पंचांनी (रेफ्री) कसलाही विलंब न लावता स्पेनच्या बाजूने पेनल्टीचा निर्णय दिला. या सुवर्णसंधीचा फायदा उठवत मिकेल ओयारझाबाल याने अचूक आणि वेगवान शॉट मारत चेंडू थेट गोलपोस्टच्या उजव्या कोपऱ्यात धाडला. फ्रान्सचा गोलकीपर माईक मेग्नन याला ओयारझाबालचा हा उत्कृष्ट शॉट रोखता आला नाही. या गोलसह स्पेनने सामन्यात १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ओयारझाबालचा या चालू स्पर्धेतील हा पाचवा गोल ठरला.
पेद्रो पोरोचा निर्णायक गोल
पहिल्या हाफमध्ये १-० अशा पिछाडीवर पडल्यानंतर फ्रान्सने दुसऱ्या हाफमध्ये जोरदार पुनरागमन करण्यासाठी आक्रमणाची धार वाढवली. फ्रान्सचे खेळाडू सातत्याने स्पेनच्या डी-एरियामध्ये चेंडू घेऊन जात होते, परंतु स्पेनच्या भक्कम बचावफळीने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.सामन्याच्या ५८ व्या मिनिटाला स्पेनने फ्रान्सला दुसरा मोठा धक्का दिला. डॅनी ओल्मोने रचलेल्या अप्रतिम चालीवर पेद्राे पोरो याने कोणतीही चूक न करता एक शानदार गोल केला आणि स्पेनची आघाडी २-० अशी मजबूत केली. या दुसऱ्या गोलने फ्रान्सच्या पुनरागमनाच्या उरल्यासुरल्या आशांवर पूर्णपणे पाणी फेरले. या गोलनंतर स्पेनने सामन्यावर आपले पूर्ण नियंत्रण राखले आणि बचावात्मक पवित्रा घेत फ्रान्सला गोल करण्याची एकही मोठी संधी दिली नाही.
किलियन एम्बाप्पे निष्प्रभ
संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला फ्रान्सचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर किलियन एम्बाप्पे या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. स्पेनच्या बचावफळीने एम्बाप्पेला साखळदंडासारखे जखडून ठेवले होते. संपूर्ण सामन्यात त्याला खेळण्यासाठी मोकळी जागाच मिळाली नाही. अनेक वेळा तो ‘ऑफसाइड’ ठरला, ज्यामुळे फ्रान्सच्या आक्रमणाची गती मंदावली. दुसऱ्या हाफमध्ये निराशा पदरी पडल्याने एम्बाप्पेला पंचांकडून पिवळे कार्ड देखील दाखवण्यात आले. या पराभवासोबतच फ्रान्सची ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी हुकली आहे. फ्रान्सने २०१८ चे विजेतेपद पटकावले होते, तर २०२२ मध्ये ते उपविजेते ठरले होते. यंदा अंतिम फेरी गाठून सलग तीन विश्वचषक फायनल खेळण्याचा पराक्रम करण्यापासून फ्रान्सचा संघ थोडक्यात चुकला.
पॅरिसमध्ये जाळपोळ
डॅलस स्टेडियमवर सामन्याची अंतिम शिट्ठी वाजताच फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये प्रचंड संताप अनावर होऊन दंगल भडकली. पराभवामुळे संतप्त झालेल्या चाहत्यांनी पॅरिसमधील अनेक भागांत रस्त्यावर उतरून तोडफोड आणि जाळपाेळ केली. अनेक वाहने आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान करण्यात आले असून, पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. या हिंसक आंदोलनाचे आणि जाळपोळीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. दरम्यान, या दारुण पराभवानंतर फ्रान्सचा कर्णधार आणि स्टार खेळाडू कायलिन एम्बाप्पे याने पराभवाची संपूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे आपल्या देशवासीयांची माफी मागितली असून, हा पराभव अत्यंत वेदनादायी असल्याचे मान्य केले आहे.
फ्रान्सची तिसऱ्या स्थानासाठी होणार लढत
विश्वचषक विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या फ्रान्सच्या संघाचा या स्पर्धेतील प्रवास अद्याप संपलेला नाही. आता फ्रान्सचा संघ स्पर्धेत तिसरे स्थान पटकावून आपला सन्मान राखण्यासाठी मैदानात उतरेल. तिसऱ्या स्थानाचा सामना १८ जुलै रोजी खेळवला जाईल. या सामन्यात विजय मिळवून तिसरे स्थान पटकावण्याचा आणि सन्मानपूर्वक स्पर्धेचा निरोप घेण्याचा फ्रान्सचा प्रयत्न असेल. फ्रान्सने आतापर्यंत १९९८ आणि २०१८ मध्ये असे दोन वेळा फिफा विश्वचषक जिंकला आहे, तर गेल्या २०२२ च्या विश्वचषकात ते उपविजेते राहिले होते.