मुख्यमंत्र्यांची घोषणा : आधुनिक अभ्यासक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी गोवन वार्ता
पणजी : गोव्यातील सर्व आयटीआय आयएसओ प्रमाणित झाल्या आहेत. येणाऱ्या काळात आयटीआयमध्ये १८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. आयटीआयमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांना प्राधान्याने कायम केले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. बुधवारी पणजीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी न्या. अभय सप्रे, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना, कौशल्य विकास खात्याचे संचालक विनायक कांबळी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘स्कील इंडिया’ उपक्रमानंतर गोव्यातील आयटीआयमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पूर्वी आयटीआय म्हणजे दुय्यम दर्जाचा अभ्यासक्रम समजला जात होता. मात्र आम्ही ही मानसिकता बदलत आहोत. येथील आयटीआयमध्ये आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास करण्याचा आमचा हेतू आहे. आठवी किंवा दहावीनंतर दोन वर्षे आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी आणि बारावीच्या समतूल्य दर्जाचे प्रमाणपत्र दिले जात आहे. याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा.
मुख्यमंत्री म्हणाले की, आज आमच्या आयटीआय विद्यार्थ्यांमध्ये नोकऱ्या देण्याची क्षमता निर्माण झाली आहे. नुकताच भारत आणि यूकेमध्ये करार झाला आहे. यानुसार गोव्यातील विविध उत्पादने कोणत्याही शुल्काशिवाय यूकेमध्ये निर्यात करता येतील. स्थानिक एमएसएमई उद्योजक, मत्स्योद्योग, शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. राज्यातून अधिकाधिक उत्पादने निर्यात करण्यावर भर द्यावा. गोमंतकीयांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यामध्ये विविध औद्योगिक संघटनांची मदतदेखील आवश्यक आहे.
विशेष विद्यार्थ्यांनी केलेल्या गणेशमूर्ती घ्या !
मुख्यमंत्री म्हणाले की, येथील प्रदर्शनात विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मी पोलीस खात्याला या विद्यार्थ्यांकडून गणेशमूर्ती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. अन्य नागरिकांनीदेखील या विद्यार्थ्यांकडून गणेशमूर्ती घ्यावेत.
नियम पाळल्यास अपघात टाळणे शक्य : न्या. सप्रे
सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा सल्लागार समितीचे न्या. सप्रे म्हणाले की, देशात दरवर्षी रस्ते अपघातात लाखो लोकांचे जीव जात आहेत. बहुतेक अपघात हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न घालणे, मद्यपान करून वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवल्यामुळे झाले आहेत. नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येणे शक्य आहे. गोव्याला शून्य अपघात राज्य करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.