कालिदास दिनानिमित्त कार्यक्रम : ‘एल निनो’चे वर्णनही पंचांगात असल्याचा दावा

कालिदास दिनानिमित्त संस्कृत पुस्तकाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत प्रसाद लोलयेकर व बाळाजी शेणवी.
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : हवामान खात्याने ५ जूनपासून पाऊस सुरू होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, पंचांगात २२ जूनपासून पाऊस सुरू होईल, असे नमूद करण्यात आले होते आणि प्रत्यक्षात तोच अंदाज खरा ठरला, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. ‘एल निनो’बाबतचे सविस्तर वर्णनही पंचांगात असल्याचे त्यांनी सांगितले.
पुराभिलेख विभागातर्फे कालिदास दिनानिमित्त पणजी येथील मॅकेनीज पॅलेसमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री तथा पुराभिलेख मंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी पुराभिलेख विभागाचे सचिव प्रसाद लोलयेकर आणि संचालक बाळाजी शेणवी उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कालिदास यांनी आपल्या मूळ श्लोकांमध्ये पावसाचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. आज आपण पावसातील अनिश्चिततेचा अनुभव घेत आहोत आणि भविष्यातील हवामान संकट ही मोठी चिंता बनली आहे.
हवामान खात्याने ५ जूनपासून पाऊस सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, दाते पंचांगात २२ जूनपासून पावसाची सुरुवात होईल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते आणि तेच प्रत्यक्षात घडले. ५ जूनला किरकोळ पाऊस झाला, मात्र २२ जूनपासून सुरू झालेला पाऊस सातत्याने बरसला. पर्यावरणाशी संबंधित गणित आणि ‘एल निनो’विषयीची माहितीही पंचांगात नमूद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
ई-युगात संस्कृत शिकणाऱ्यांची संख्या कमी होत असली, तरी आजही काही जण संस्कृत अध्ययनाचा ध्यास घेत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. संस्कृत भाषेचे ज्ञान भविष्यात उपयुक्त ठरणार असून नवोपक्रम, गणित आणि संशोधन क्षेत्रातही संस्कृतचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. पुराभिलेख विभागात पोर्तुगीज भाषेतील दस्तऐवजांचे जतन केले जाते. मात्र, त्याहीपूर्वी संस्कृत भाषेचे अस्तित्व होते. विभागाकडे सुमारे ३ कोटी हस्तलिखिते असून त्यापैकी ५० लाख हस्तलिखितांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
मठ आणि मंदिरांमध्ये असलेली हस्तलिखिते जतन करण्यासाठी ती विभागाकडे सुपूर्द करा. ही हस्तलिखिते संबंधितांची मालमत्ता राहील; मात्र त्यांचे संवर्धन आणि भावी संशोधनासाठी त्यांचा उपयोग होईल. अन्यथा ही अमूल्य परंपरा काळाच्या ओघात नष्ट होण्याचा धोका आहे.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री