खवय्ये खूश : बांगडे, वेर्ल्यो, बुराटे आणि कालवांनी बाजार गजबजले

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : गोव्यात सध्या खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी असली तरी पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने पारंपरिक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात ताजी मासळी मिळू लागली आहे. गेल्या महिनाभरापासून गोमंतकीयांना गोड्या पाण्यातील मासळीवर समाधान मानावे लागत होते. मात्र, आता ताज्या समुद्री मासळीची आवक वाढल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने वातावरण स्वच्छ झाले असून समुद्रही शांत आहे. त्यामुळे किनाऱ्यालगत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यांत बांगडे, वेर्ल्यो, बुर्राटे आणि कालवा मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. एका मच्छीमाराने सांगितले की, सध्या समुद्र शांत असून पाण्याचे तापमान वाढल्यामुळे मासे पाण्याच्या वरच्या थरात आणि किनाऱ्याजवळ येऊ लागले आहेत. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने मासे खोल पाण्यात राहतात. त्यामुळे कितीही जाळी टाकली तरी अपेक्षित प्रमाणात मासळी मिळत नाही. मात्र, समुद्र शांत होताच आणि पाण्याचे तापमान वाढताच मासे किनाऱ्याकडे येतात. त्यामुळे मच्छीमारांना मोठा फायदा होत आहे.
बांगड्यांना मागणी वाढली
सध्या मच्छीमार खोल समुद्रात न जाता किनाऱ्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर जाळे टाकत आहेत. विशेषतः बांगडे मोठ्या प्रमाणात मिळत असून बाजारात त्यांना मोठी मागणी आहे. बाजारात पोहोचताच ही मासळी तातडीने विकली जात आहे. बांगड्यांबरोबरच कालवेही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
वेर्ल्यो, बुर्राटे, कालवा बाजारात दाखल
सध्या गोव्यातील पारंपरिक मासळी बाजारात मोठे बांगडे शंभर रुपयांना सहा, तर लहान बांगडे शंभर रुपयांना दहा या दराने विकले जात आहेत. मोठे वेर्ल्यो २०० रुपयांना २५ ते ३० नग मिळत आहेत. बुर्राटे १०० रुपयांना एक वाटा या दराने विकले जात असून, कालवा ५०० रुपयांना तीन वाटे या दराने उपलब्ध आहेत.