‘नीट २०२१’ मध्ये गोव्यात प्रथम; शैक्षणिक, क्रीडा, अभ्यासेतर क्षेत्रातही चमक

गोवन वार्ता प्रतिनिधी
पैंगीण : सादोळशे-काणकोण येथील अभिदा बार्रेटो हिने पुण्यातील प्रतिष्ठित ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’मधून (एएफएमसी) एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. भारतीय सैन्यात ‘कमिशनड् लेफ्टनंट’ म्हणून देशाची सेवा करण्यासाठी ती आता सज्ज झाली आहे.
अभिदाच्या कुटुंबात लष्करी पार्श्वभूमी नसतानाही शालेय जीवनात भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला पाहून तिच्या मनात गणवेशाचे आकर्षण निर्माण झाले. बारावीच्या जीवशास्त्र शिक्षकांनी एएफएमसीची माहिती दिल्यानंतर डॉक्टर होण्याचे आणि देशसेवेचे तिचे स्वप्न अधिक दृढ झाले. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीत तिने उल्लेखनीय यश मिळवत ‘नीट २०२१’ परीक्षेत गोव्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर एम्स आणि जेआयपीएमईआर यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेशाची संधी असतानाही तिने एएफएमसीची निवड करून आपले ध्येय साध्य करण्याचा निर्णय घेतला. कठोर अभ्यासक्रम पूर्ण करून एमबीबीएसच्या अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अभिदाने शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
देशसेवेची प्रेरणा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्टता यांचा सुंदर संगम साधणारी अभिदा बार्रेटो आता भारतीय सशस्त्र दलात वैद्यकीय अधिकारी म्हणून राष्ट्रसेवेचे नवे पर्व सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या यशामुळे गोव्याच्या शैक्षणिक आणि लष्करी क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
अभिदा बार्रेटोची उल्लेखनीय कामगिरी
‘नीट २०२१’मध्ये गोवा राज्यात प्रथम क्रमांक
एएफएमसी, पुणे येथून एमबीबीएस पूर्ण
मेजर जनरल एन. डी. पी. करानी ट्रॉफी (२०२५)
शैक्षणिक व अभ्यासेतर उपक्रमांतील ग्रॅज्युएट विंगची द्वितीय सर्वोत्तम उत्तीर्ण विद्यार्थिनी
शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, बालरोगशास्त्र, औषधशास्त्र या विषयांत सुवर्णपदके
एमबीबीएसच्या १४ पैकी १३ विषयांत विशेष प्रावीण्य
महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी