Home >> ताज्या बातम्या >> बेकायदेशीर खाण घोटाळ्यातील २०१३ चा गुन्हा रद्द

बेकायदेशीर खाण घोटाळ्यातील २०१३ चा गुन्हा रद्द

उच्च न्यायालयाचा निकाल : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th July, 11:28 pm
बेकायदेशीर खाण घोटाळ्यातील २०१३ चा गुन्हा रद्द

शाह आयोगाच्या २०१२च्या शिफारशीची दखल घेत गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने २०१३ मध्ये खाण व्यवसायाशी निगडित दाखल केलेला गुन्हा आता उच्च न्यायालयानेच रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२३ मध्ये उच्च न्यायालयाचा तो मूळ आदेशच रद्द केल्याचे निरीक्षण नोंदवत, न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी हा गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला आहे.

या प्रकरणी साळगावकर मायनिंग इंडस्ट्री प्रा. लि., सालिथो ओर्स प्रा. लि., मारझूक अँड कॅडर प्रा. लि., शांतीलाल कुशलदास अँड ब्रॉस. प्रा., एस. कांतीलाल अँड कंपनी प्रा., सोवा आणि मिनरिया नॅशनल लि. यांनी ६ जून २०२६ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी राज्य सरकार, विशेष तपास पथक (एसआयटी) आणि खाण खात्याला प्रतिवादी केले होते.

३५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

न्यायमूर्ती शाह आयोगाने २०१३ मध्ये ३५,००० कोटी रुपयांच्या बेकायदेशीर खाण घोटाळ्याप्रकरणी अहवाल सादर केला होता. त्यानंतर, या अहवालात नमूद केलेल्या १५० हून अधिक व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे निर्देश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते.

त्यानुसार, तत्कालीन खाण संचालक प्रसन्ना आचार्य यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने १९ ऑगस्ट २०१३ रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. यात गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी अनेक मोठे राजकीय नेते, शासकीय अधिकारी (नोकरशहा) आणि खाण मालकांना संशयित करण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सुमारे १२६ मायनिंग लिजेसची चौकशी केली. त्यानंतर गुन्हे शाखेने डॉ. प्रफुल्ल हेदे खाण प्रकरणात सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याचदरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर १७ जानेवारी २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. त्यानंतर या आरोपपत्र प्रकरणात काहीच पुरावे नसल्यामुळे सत्र न्यायालयाने संशयितांना आरोपातून मुक्त केले.

तपासाला वाव नसल्याचे निरीक्षण

• याचिकादारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली. तसेच, या प्रकरणात १८ जणांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती दिली.

• या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, याचिकादारांतर्फे अॅड. योगेश नाडकर्णी यांनी बाजू मांडली, त्यांना सिमरन खांडीलकर व इतरांनी साथ दिली.

• दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा मूळ आदेशच रद्द केल्यामुळे आता या प्रकरणात तपास करण्यास वाव नसल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी हा गुन्हा रद्द केला.

हेही वाचा
सर्व पहा