विधानसभेचा आखाडा : शिवोली

काँग्रेसकडून अनेक नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक
भाजपची पसंत लोबो की दयानंद मांद्रेकर याबाबत उत्सुकता
अंतर्गत वादामुळे आरजीपीचा मतदारसंघातील प्रभाव ओसरला
किनारी भागातील ध्वनिप्रदूषणाची समस्या सर्वांसाठी डोकेदुखी
गोवन वार्ता
म्हापसा : शिवोली मतदारसंघात गेल्यावेळी प्रथमच महिला आमदार निवडून येण्याचा विक्रम डिलायला लोबो यांनी केला होता. दुसऱ्यांदा निवडून येण्यासाठी त्या प्रयत्नरत आहेत. मात्र त्यांच्यासमोर भाजपचे अंतर्गत राजकारण आणि काँग्रेस पक्षाचे आव्हान आहे.
डिलायला लोबो
डिलायला लोबो यंदा भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. गेल्यावेळी त्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या. राजकीय घडामोडीनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर डिलायला लोबो भाजपमध्ये सामील झाल्यामुळे शिवोलीतील काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. या मतदारसंघात सत्ताबदल तसेच काँग्रेसला बऱ्याच वर्षांनी विजय मिळवून देण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या निवडणुकीत निर्धारपूर्वक कार्य केले होते. त्यात त्यांना यशही आले होते; पण आमदार लोबो यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उत्साहावर अवघ्या काही महिन्यांतच पाणी पडले होते. यंदा पुन्हा हा मतदारसंघ काँग्रेसकडेच ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
गजानन तिळवे
योगेश गोवेकर आणि गजानन तिळवे यांच्याशिवाय काँग्रेसचे युवा नेता चंदन मांद्रेकर हेदेखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मांद्रेकर हे सुमारे २६ वर्षे सक्रियपणे पक्ष कार्य करत आहेत. त्यामुळे यावेळी पक्षाकडून संधी मिळेल, अशी त्यांना आशा आहे. शिवाय राजन घाटे, पार्वती नागवेकर, रोशन चोडणकर, कपील कोरगावकर, फ्रान्सिस्को फर्नांडिस हे नेतेही पक्षाच्या उमेदवारीवर डोळा ठेवून आहेत.
मागील निवडणुकीत रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे (आरजी) गौरेश मांद्रेकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी ३,११८ मते मिळवून तिसरे स्थान प्राप्त केले होते. यावेळी आरजी पक्षामध्ये धुसफूस सुरू आहे. पक्षात दोन गट पडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. यंदाच्या निवडणुकीत या पक्षाचा प्रभाव दिसण्याची शक्यता कमी आहे. आम आदमी पक्षातर्फे पूजन मालवणकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
चंदन मांद्रेकर
शिवोली हा मतदारसंघ सहा पंचायत क्षेत्रांत विभागला आहे. यामध्ये हणजूण-कायसूव, आसगाव, वेर्ला-काणका, मार्ना-शिवोली, सडये-शिवोली व ओशेल-शिवोली यांचा समावेश आहे. सहापैकी चार गाव हे किनारपट्टी भागातील आहेत. अरबी समुद्र आणि शापोरा नदीचा किनारी भाग जगप्रसिद्र समुद्रकिनाऱ्यांमध्ये गणला जातो. मागील साडेचार वर्षांत शिवोली मतदारसंघात रस्ते, वीज व पाणी या पायाभूत विकास प्रकल्पांवर आमदारांनी भर दिला आहे. हणजूण येथे गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या जागेत ताज समूहाचा प्रशस्त हॉटेल प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असे मानले जात आहे. पुढील वर्षी हॉटेल पूर्णत्वास आल्यावर तिथे ४०० नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. सरकारने ही जागा ६० वर्षांसाठी ताज समूहाला भाडेतत्त्वावर दिली आहे. आसगाव येथील जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यरत झाला आहे. मार्ना सडये दरम्यानच्या लिंक रोडचे बांधकाम झाले आहे. माजी आमदार विनोद पालयेकर यांनी हा मार्ग पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तिथे पूल बांधण्याची योजना आखली होती. बादे वीज उपकेंद्राचे काम, गणेशपुरी ते मार्ना शिवोली रस्त्यावरील अवजड वाहनांना प्रतिबंध करणारी यंत्रणा, या रस्त्यावर पथदीपची व्यवस्था, मार्ना रस्त्याचे रुंदीकरण यासारखे विकास प्रकल्प राबवण्यात आले आहेत.
या मतदारसंघात काही ठिकाणी अजूनही वीज, पाणी पुरवठ्याची समस्या आहे. हणजूण ते वागातोर दरम्यानचा समुद्रकिनारी भाग अंधारात आहे. या किनाऱ्यावर पथदीप उभारण्याची व्यवसायिकांची मागणी प्रलंबित आहे. वझरात वागातोरसारख्या समुद्रकिनारी जाण्यासाठी आवश्यक पायवाटेची कमतरता आहे. या भागात ध्वनिप्रदूषण ही मोठी समस्या आहे. हॉटेल आणि नाईट क्लबमधून ध्वनिप्रदूषण सुरूच आहे. पर्यटक टॅक्सीसारख्या पर्यटन क्षेत्राशी निगडित स्थानिक व्यवसायिकांच्या समस्यांवर तोडगा निघालेला नाही.
योगेश गोवेकर
काँग्रेसकडून योगेश गोवेकर, गजानन तिळवे इच्छुक
काँग्रेसतर्फे जिल्हा पंचायत निवडणुकीत हणजूण मतदारसंघातून ४,५०१ मते मिळवून अवघ्या २५३ मतांच्या फरकाने पराभूत झालेले आणि पर्यटक टॅक्सी मालक संघटनेचे सक्रिय पदाधिकारी योगेश गोवेकर, तसेच त्यांचे मित्र गजानन तिळवे जे आमदार लोबो यांचे पूर्वीचे खंदे समर्थक होते, ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या या दोघांनी काँग्रेसच्या मूळ पदाधिकाऱ्यांसह शिवोलीमधील लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम हाती घेतले आहे. वीज, पाणी, रस्ते तसेच पर्यटन भागातील समस्यांवर ते प्रकाश टाकत आहेत.
दयानंद मांद्रेकर
दयानंद मांद्रेकरांचा मतदारसंघावर प्रभाव
भाजपतर्फे पुन्हा निवडणूक लढवण्यास माजी मंत्री दयानंद मांद्रेकर इच्छुक आहेत. त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने प्रचारकार्यही सुरू केले आहे. या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर सलग चारवेळा निवडून येण्याचा पराक्रम मांद्रेकर यांच्या नावावर आहे. यापूर्वी माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर हे हॅट्रीकसह चारवेळा शिवोलीतून निवडून आले होते. दोनवेळा पराभूत होऊनदेखील मांद्रेकर यांचा आजही या मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे.
शिवोली मतदारसंघातील आमदार
१९६३ : पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९६७ : पुनाजी आचरेकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९७२ : चंद्रकांत चोडणकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९७७ : चंद्रकांत चोडणकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९८० : चंद्रकांत चोडणकर (अपक्ष)
१९८४ : अशोक साळगावकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९८९ : अशोक साळगावकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९९४ : चंद्रकांत चोडणकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९९९ : दयानंद मांद्रेकर (भाजप)
२००२ : दयानंद मांद्रेकर (भाजप)
२००७ : दयानंद मांद्रेकर (भाजप)
२०१२ : दयानंद मांद्रेकर (भाजप)
२०१७ : विनोद पालयेकर (गोवा फॉरवर्ड)
२०२२ : डिलायला लोबो (काँग्रेस)